Breastfeeding Tips: आईला सर्दी-ताप झाला म्हणजे स्तनपान थांबवावे, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते योग्य काळजी घेतल्यास सामान्य आजारांमध्येही आई बाळाला सुरक्षितपणे स्तनपान देऊ शकते.
आईला सर्दी, ताप, खोकला, उलटी किंवा जुलाब यांसारखे सामान्य आजार झाले तरी बहुतांश वेळा स्तनपान थांबवण्याची गरज नसते. आईच्या दुधातून बाळाला आवश्यक पोषक आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळत असते. मात्र, अशा परिस्थितीत स्वच्छतेची काळजी घेणे, हात वारंवार धुणे, आवश्यक असल्यास मास्क वापरणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेणे महत्वाचे असते.
स्तनपान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
१. बाळाच्या जन्मानंतर शक्य तितक्या लवकर, साधारणतः पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करावे.
२. बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने फक्त आईचे दूध द्यावे.
३. बाळाची दिवसातून ७ ते ८ वेळा लघवी होत असेल आणि त्याचे वजन नियमित वाढत असेल, तर त्याला पुरेसे दूध मिळत असल्याचे मानले जाते.
४. बाळाला भूक लागल्याची चिन्हे दिसताच किंवा साधारण दोन ते चार तासांच्या अंतराने स्तनपान करावे.
५. प्रत्येक वेळी दूध पाजल्यानंतर बाळाची ढेकर काढावी.
६. स्तनपान करताना बाळाची योग्य पकड (लॅच) असणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने दूध पाजल्यास आईला वेदना होणे किंवा स्तनावर जखमा होण्याची शक्यता असते.
पहिले सहा महिने फक्त आईचे दूध का महत्त्वाचे?
जन्मापासून सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला आईच्या दुधाशिवाय पाणी, गुटी, बाळकडू, ग्राइप वॉटर किंवा इतर कोणतेही पेय देण्याची आवश्यकता नसते. आईच्या दुधातूनच बाळाला वाढीसाठी आवश्यक सर्व पोषक घटक मिळतात.
आईचे दूध हे बाळासाठी केवळ आहार नसून संसर्गापासून संरक्षण देणारे नैसर्गिक कवच मानले जाते.
सहा महिन्यांनंतर पूरक आहारासोबत स्तनपान सुरू ठेवा
बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्याच्या वाढीसाठी घरगुती, ताजे आणि पौष्टिक पूरक अन्न सुरू करावे. मात्र, स्तनपान बंद करू नये. दोन वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक काळ स्तनपान सुरू ठेवल्यास बाळाच्या शारीरिक वाढीसोबत मेंदूच्या विकासालाही मदत होते.
काम करणाऱ्या मातांसाठी स्तनपानाचे नियोजन
नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या माताही योग्य नियोजन करून स्तनपान सुरू ठेवू शकतात. आईने काढून ठेवलेले दूध काही काळ सुरक्षित ठेवता येते. मात्र, ते साठवताना स्वच्छता आणि योग्य पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे.








