Karnataka HIV Positive Students : कर्नाटकातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली, तिथल्या कॉलेजात शिकणाऱ्या तब्बल ७,००० पोरा-पोरींना एचआयव्ही झाल्याचं उघडकीस आलंय. अगदी १८ ते २५ वर्षाच्या वयोगटातील पोरा पोरींचा हा आकडा आहे, म्हणजे उडत्या पाखराचे दिवस आणि हातामध्ये एचआयव्हीचं टेन्शन… आता यातली सगळ्यात खतरनाक गोष्ट काय आहे माहितीय का? ही ७ हजार पोरं तर चाचणी केल्यामुळं समोर आली, पण कर्नाटकात अजून ५४,००० पेक्षा जास्त लोक अशे फिरतायत ज्यांना स्वतःलाच माहीत नाही की आपल्या अंगात हा व्हायरस घुसलाय. होय, १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये HIV संसर्गाचे हे आकडे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अखेर कर्नाटकमध्ये हा धोका इतक्या वेगाने कसा वाढला? आणि या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आता कोणती मोठी पावले उचलणार आहे?
कर्नाटकात 7,000 कॉलेज विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह; 54 हजारांना संसर्गाची माहितीच नाही! ( Karnataka HIV Positive Students )
कर्नाटक हे देशातील एड्सबाधित रुग्णसंख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे राज्य म्हणून ओळखले जाते. नुकत्याच समोर आलेल्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार, राज्यात एचआयव्ही संसर्गाचा प्रसार वेगाने वाढत असल्याचे दिसून आले. १८ ते २५ वयोगटातील ७,००० हून जास्त उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि तरुण एचआयव्ही पॉझिटिव्ह ( HIV Positive ) आढळले आहेत… या गंभीर परिस्थितीची नोंद घेत कर्नाटक सरकारने आता अभियांत्रिकी, तांत्रिक आणि पारंपारिक पदवी महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही तपासणी आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेच्या शिफारशीनंतर, विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठ आणि राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने तातडीने या संदर्भात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : तुकाराम मुंढेंविरोधात 29 अधिकाऱ्यांचे बंड; दोन शिफ्ट, सुट्ट्या आणि
18 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये HIV संसर्ग झपाट्याने वाढल्याने खळबळ ( Karnataka HIV Positive Students )
राज्यातील तरुण पिढीमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण ज्या वेगाने वाढत आहे, त्याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या आकडेवारीचे बारकाईने विश्लेषण केले तर असं दिसून येतंय की, कर्नाटकात १८ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये हा संसर्ग सर्वाधिक वेगाने पसरत आहे. या वयोगटातील एचआयव्ही पॉझिटिव्ह ( HIV Positive ) तरुण तरुणींची संख्या २०२३-२४ मध्ये ४४,५०० एवढी नोंदवली गेली होती. हाच आकडा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात वेगाने वाढून तब्बल ६६,६०० वर पोहोचलाय. या एकूण आकड्यांपैकी ७,००० हून जास्त फक्त १८ ते २५ वयोगटातील कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार, संपूर्ण कर्नाटक राज्यात अंदाजे २ लाख ६० हजार एचआयव्ही ग्रस्त व्यक्ती जीवन जगत आहेत. या मोठ्या रुग्णसंख्येपैकी फक्त २ लाख ५ हजार रुग्णांवर सध्या नियमित अँटीरेट्रोव्हायरल थेरपी म्हणजेच एआरटी उपचार सुरू आहेत. याचाच अर्थ असा की, राज्यातील जवळपास ५४,००० पेक्षा जास्त व्यक्ती अशा आहेत ज्यांना अद्याप स्वतःला एचआयव्ही संसर्ग झाल्याची कोणतीही माहिती नाही. ही अज्ञात रुग्णसंख्या सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे, कारण संसर्गाची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून नकळतपणे इतरांना संसर्ग पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. हाच उपचार आणि निदानाचा मोठा फरक भरून काढण्यासाठी सरकारने महाविद्यालयीन स्तरावर व्यापक मोहीम आखली आहे.
महाविद्यालयांमध्ये HIV तपासणी आणि समुपदेशन शिबिरांचा सरकारचा मोठा निर्णय
कॉलेजांमध्ये आयोजित केली जाणारी ही एकात्मिक आरोग्य शिबिरे सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये अनिवार्य करण्यात आली असली, तरी सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर आणि नैतिक मर्यादा स्पष्ट केली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याची एचआयव्ही तपासणी किंवा स्क्रीनिंग त्याच्या संमतीशिवाय केले जाणार नाही. इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणजेच पूर्ण माहिती देऊन घेतलेली संमती या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन केले जाईल. अनेकदा तरुण मुले भीती किंवा बदनामीच्या धास्तीने अशा तपासण्यांपासून दूर पळतात. विद्यार्थ्यांमधील हा संकोच दूर करण्यासाठी आणि त्यांची वैयक्तिक गोपनीयता पूर्णपणे जपण्यासाठी कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेने एक नाविन्यपूर्ण डिजिटल पाऊल उचलले आहे. अंतर्गत जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून महाविद्यालयांमध्ये क्यूआर कोड आधारित सेल्फ-रिस्क असेसमेंट टूल म्हणजेच स्वतःच्या धोक्याचे मूल्यमापन करणारे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी हा क्यूआर कोड आपल्या मोबाईलवरून स्कॅन करून गोपनीय पद्धतीने आपल्याला संसर्गाचा किती धोका आहे हे जाणून घेऊ शकतात. जर त्यांना अधिक मार्गदर्शनाची किंवा चाचणीची आवश्यकता वाटली, तर त्यांना या प्रणालीद्वारे जवळच्या सरकारी तपासणी आणि उपचार केंद्रांची माहिती सहज मिळते.
एका वृत्तपत्रानुसार आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेचा मुख्य उद्देश कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा तरुण पिढीला लक्ष्य करणे किंवा समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणे हा नसून, केवळ जनजागृती वाढवणे आणि वेळेवर निदान करून देणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार, एचआयव्हीचे जितक्या लवकर निदान होईल, तितक्या लवकर एआरटी उपचार सुरू करता येतात, ज्यामुळे बाधित व्यक्ती जास्तकाळ आणि अत्यंत सामान्य आयुष्य जगू शकते. आधुनिक वैद्यकीय विज्ञामुळे एचआयव्ही हा आता जीवघेणा आजार राहिला नसून, वो नियमित औषधोपचारांनी पूर्णपणे नियंत्रित ठेवता येणारा एक जुनाट आजार बनला आहे. वेळेवर चाचणी केल्यास रक्तातील विषाणूंचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते आणि त्यामुळे पुढील पिढीला किंवा जोडीदाराला होणारा प्रसार रोखण्यात यश मिळते.
असुरक्षित संबंध, जनजागृतीचा अभाव आणि व्यसनांमुळे संसर्ग वाढल्याचा अंदाज
महाविद्यालयीन तरुणांमध्ये हा संसर्ग वाढण्यामागे अनेक कारणे कारणीभूत ठरलीय. असुरक्षित शारीरिक संबंध, एचआयव्ही आणि लैंगिक आरोग्याविषयी असणारी माहितीची कमतरता, आणि अंमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या सुयांचा पुनर्वापर ही या वयोगटातील संसर्गाची मुख्य कारणे आहेत. आजकालच्या जीवनशैलीमध्ये तरुण पिढीमध्ये वाढते डेटिंग ॲप्सचे चलन आणि आरोग्याविषयीची बेफिकरी यामुळे देखील हे प्रमाण वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कॉलेजांमध्ये फक्त चाचण्या न करता मोठ्या प्रमाणावर समुपदेशन सत्रे आयोजित केली जाणार आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित आरोग्य सवयी, condoms चा वापर आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली जाईल.
HIV बाबत भीती नव्हे तर वेळेवर चाचणी, उपचार आणि जनजागृतीची गरज
केंद्र सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील देशभरातील सर्व तांत्रिक आणि पदवी संस्थांना आपापल्या कॅम्पसमध्ये एचआयव्ही विरुद्ध जनजागृती मोहीम राबवण्याचे आदेश पूर्वीच दिले होते. कर्नाटकातील या ताज्या आकडेवारीनंतर आता या राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून केवळ एचआयव्हीच नव्हे, तर इतर लैंगिक संसर्गजन्य आजारांची माहिती देखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
७,००० चा हा आकडा फक्त वाढत्या संसर्गाचा निदर्शक नाही, तर गेल्या काही काळात वाढलेल्या चाचण्या, सुधारित आरोग्य अहवाल आणि लवकर झालेले निदान यामुळे देखील हा आकडा स्पष्टपणे समोर आला असू शकतो. पूर्वी लोक चाचणीच करत नसल्याने अनेक केसेस समोर येत नव्हत्या. त्यामुळे या आकडेवारीकडे केवळ भीती म्हणून न पाहता, एक जागृतीची मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे.








