• Home
  • राजकारण
  • कर्नाटकात राजकीय भूकंप: मुख्यमंत्री सिद्धरमैया यांना राजीनामा देण्याचे आदेश
Top News

कर्नाटकात राजकीय भूकंप: मुख्यमंत्री सिद्धरमैया यांना राजीनामा देण्याचे आदेश

Karnataka CM Siddaramaiah Resignation

Karnataka CM Siddaramaiah Resignation : कर्नाटकच्या राजकीय  (Karnatka Politics) पटावर प्रचंड उथला-पुथल निर्माण झाली आहे. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरमैया (CM Siddaramaiah) यांना पदाचा राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिद्धरमैया यांची काँग्रेसचा सर्वात मोठा आणि सन्मानित ओबीसी चेहरा म्हणून ओळख आहे. २०२९च्या लोकसभा (2029 Loksabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका देण्याची योजना पक्षश्रेष्ठींनी आखली आहे. त्या अनुषंगाने या अदलाबदलीच्या राजकारणाला वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राहुल गांधींसह अन्य वरिष्ठ नेत्यांनी सिद्धरमैया यांच्याशी चर्चा केली. त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पाठवण्याचे आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये एक महत्त्वपूर्ण पद देण्याची ऑफर देण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांना आश्वासन दिले आहे की, त्यांच्या सर्व वैयक्तिक आणि क्षेत्रीय हितसंबंधांची काळजी घेतली जाईल. हा बदल सन्मानजनक असेल आणि त्यांची राजकीय प्रतिष्ठा कुठेही कमी होणार नाही, अशी हमी देण्यात आली आहे. कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून आहे.

मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेऊन राजीनामा

या घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये दोन गट स्पष्टपणे समोर आले आहेत. एक गट उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहे, तर दुसरा गट सिद्धरमैया यांच्या बाजूने ठाम आहे. सिद्धरमैया यांनी आतापर्यंत राज्याच्या राजकारणात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु हायकमांडच्या निर्णयापुढे ते ‘हायकमांडच्या निर्णयाला मान्यता देतील’ असे सांगितल्याचे समजते. ते उद्या २८ मे रोजी सायंकाळी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी ते मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेऊन राजीनामा सादर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद

काँग्रेस नेतृत्वाचा यामागचा मुख्य हेतू म्हणजे २०२९च्या निवडणुकीसाठी ओबीसी मतदारांना एकत्र करणे. सिद्धरमैया यांच्या राष्ट्रीय नेतृत्वामुळे पक्षाला कर्नाटकसह इतर राज्यांत लाभ होईल, असे मानले जात आहे. डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कर्नाटकात २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा राजकीय बदल होणार आहे.

सिद्धरमैया हे कर्नाटकातील दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत. त्यांच्या काळात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या. मात्र, पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि हायकमांडच्या रणनीतीमुळे हा बदल अपरिहार्य ठरला आहे. पुढील काही दिवसांत कर्नाटकाच्या राजकारणात मोठ्या हालचाली अपेक्षित आहेत. सिद्धरमैया यांचा निर्णय आणि पक्षाची पुढील रणनीती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts