Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
गुन्हा

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Bhiwandi Building Collapse

Bhiwandi Building Collapse: शहरातील बालाजी नगर-गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही तळमजला आणि चार मजल्यांची इमारत गुरुवारी उशिरा रात्री अचानक कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, पाच ते सहा जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल आणि महानगरपालिकेची यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे बचाव पथकांना दुर्घटनास्थळी पोहोचण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. अखेर इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. त्यानंतर बचाव पथकांना ढिगाऱ्यापर्यंत पोहोचून शोधमोहीम सुरू करता आली.

हेही वाचा: 31 वर्षांची ‘मिली’ ठरू शकते जगातील सर्वात वयोवृद्ध मांजर; दीर्घायुष्याचं रहस्य ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

कोहिनूर अपार्टमेंटची उभारणी

माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंटची उभारणी २०१२ मध्ये झाली होती. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित होत होते. त्यामुळे महानगरपालिकेने काही काळापूर्वीच ही इमारत धोकादायक घोषित करून रहिवाशांना नोटिसाही बजावल्या होत्या.

दरम्यान, इमारतीच्या एका विंगमधील तळमजल्यावरील काही खांब कमकुवत झाल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गुरुवारी सायंकाळपासूनच इमारतीला तडे जाऊ लागले होते. रात्रीच्या सुमारास इमारत एका बाजूला झुकत असल्याचे लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र काही जण आपले सामान घेण्यासाठी पुन्हा इमारतीत गेले होते, तर तळमजल्यावर दुरुस्तीचे कामही सुरूच होते. त्याचवेळी इमारत अचानक कोसळली.

या घटनेबाबत आमदार महेश चौघुले यांनी सांगितले की, संबंधित इमारत धोकादायक असल्याची नोटीस आधीच देण्यात आली होती. सध्या विविध बचाव पथके घटनास्थळी कार्यरत असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महापौर नारायण चौधरी यांनी सांगितले की, अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. दुर्घटनाग्रस्त कुटुंबांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था जवळील समाजमंदिर आणि शाळांमध्ये करण्यात आली आहे. तसेच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांनी सांगितले की, इमारतीतील खांबांच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांत संपूर्ण इमारत कोसळली. अरविंद गुप्ता आणि त्यांच्या पत्नीने वेळेत बाहेर पडून जीव वाचवला, तर त्यांची मुलगी कोमल काही काळ ढिगाऱ्याखाली अडकली होती. तिने स्वतःच्या प्रयत्नांनी बाहेर पडत जीव वाचवला.

घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनीही तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याने शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts