NCMC Smart Card: राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. एसटी बस प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डची अनिवार्यता आता 1 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Road Transport Corporation) अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या NCMC स्मार्ट कार्डची (NCMC Smart Card) अंतिम मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढ झाल्याची माहिती दिली. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा:
यापूर्वी १ ऑगस्टपासून एसटी प्रवासातील (Maharashtra ST) सवलतींची NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कार्ड वितरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने पात्र लाभार्थ्यांना सवलतींपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी अंमलबजावणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोणत्या सवलतींची आवश्यक आहे स्मार्ट कार्ड?
राज्य सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुविधा, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिले जाते. या योजनांचा लाभ अधिक सोप्या, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने मिळावा यासाठी NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे.
मात्र, अनेक प्रवाशांनी कार्डसाठी अर्ज करूनही त्यांना अद्याप कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे कार्ड नसल्याच्या कारणामुळे पात्र प्रवाशांना सरकारी योजनांपासून दूर ठेवले जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांनी लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
“एसटीच्या सवलती या सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत. तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही पात्र नागरिकाला त्रास होऊ नये, यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
या निर्णयामुळे अद्याप स्मार्ट कार्ड न मिळालेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच प्रवाशांनी या वाढीव कालावधीचा वापर करून स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्मार्ट कार्ड केंद्रांवर वाढली गर्दी
दरम्यान, राज्यातील विविध एसटी डेपो आणि केंद्रांवर स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी कार्ड मिळवण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.
प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, आता 1 सप्टेंबरपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड काढण्याची संधी उपलब्ध असणार आहे.









