Pune Car Stunt: पुण्यातील डेक्कन परिसरात काही तरुणांनी मद्यपान करून भरधाव कारमधून धोकादायक स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हातात बिअरच्या बाटल्या घेत केलेल्या या प्रकाराचा VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना अटक केली.
पुण्यातील डेक्कन (Deccan Viral Video) परिसरात मध्यरात्री भरधाव कारमधून धोकादायक स्टंट करणाऱ्या चार तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कारच्या खिडक्यांमधून शरीराचा काही भाग बाहेर काढून तसेच हातात बिअरच्या बाटल्या (drunk driving Pune) घेऊन तरुणांनी रस्त्यावर गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
पुण्यातील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच डेक्कन परिसरातील या प्रकारामध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा: भाजपवर टीकेनंतर राज ठाकरे थेट फडणवीसांच्या भेटीला; ‘वर्षा’वरील भेटीमागे नेमकं काय कारण?
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोड, नळ स्टॉप आणि डेक्कन परिसरातून एक कार भरधाव वेगाने जात होती. कारमध्ये असलेल्या तरुणांनी खिडक्यांच्या काचा खाली करून शरीराचा काही भाग बाहेर काढला होता. यावेळी त्यांच्या हातात बिअरच्या बाटल्याही दिसत होत्या.
कार वेगाने धावत असताना तरुणांकडून आरडाओरडा आणि स्टंटबाजी सुरू होती. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकला असता.
व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे तपास सुरू केला.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या वाहनाचा क्रमांक पोलिसांनी तपासला आणि त्याच्या आधारे संबंधित तरुणांचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी संबंधित तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियाणातून पुण्यात मित्रांना भेटण्यासाठी आल्याची माहिती
पोलिसांच्या (Pune Police) प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तरुण हरियाणातून पुण्यात आपल्या मित्रांना भेटण्यासाठी आले होते. मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर त्यांनी मद्यपान केले आणि त्यानंतर वाहनातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.
मद्यपान करून वाहन चालवणे आणि रस्त्यावर अशा प्रकारे स्टंट करणे हे स्वतःसह इतरांच्या जीवितासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.









