Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री झालेल्या २० मिनिटांच्या बैठकीने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या राजकारणात बुधवारी मध्यरात्री झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीने नव्या चर्चाना उधाण आले आहे. फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी सुमारे २० मिनिटे झालेल्या या बैठकीमागे नेमके काय कारण होते, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. अधिकृतरीत्या या बैठकीतील चर्चेची माहिती समोर आलेली नसली, तरी रायगडच्या पालकमंत्रीपदाची तिढा, महामंडळांचे वाटप, आमदारांच्या विकासनिधीबरोबरच सर्वोच्च न्यायलयातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीची पार्श्वभूमीही चर्चेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा: ध्रुव जुरेलसमोर ‘करो या मरो’ची वेळ? आता टॅलेंट नाही, तर सातत्य सिद्ध करण्याचं आव्हान!
युक्तिवादामुळे निकालाबाबत विविध अंदाज व्यक्त
सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षातील फुटी आणि सत्तासंघर्षाशी संबंधित प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीतील युक्तिवादामुळे निकालाबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस यांची अचानक झालेली बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, या बैठकीत न्यायालयीन प्रकरणावर (Supreme Court hearing) चर्चा झाली का, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
स्थानिक राजकीय समीकरणे
या बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रलंबित प्रश्न असल्याचे सांगितले जात आहे. या पदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये काही काळापासून मतभेद असल्याची चर्चा आहे. भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा असली, तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे लक्षात घेऊन सर्वानुमते तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. (BJP Maharashtra)
याशिवाय राज्यातील विविध महामंडळांच्या नियुक्त्या आणि त्यांचे वाटप लवकर पूर्ण करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक इच्छुक नेते आणि कार्यकर्ते नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत असल्याने हा विषयही महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच शिंदे गटातील आमदारांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रात्री झालेल्या फडणवीस-शिंदे बैठकीमुळे या दोन भेटींचा काही संबंध आहे का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या सर्व चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून पुढील काही दिवसांत महायुतीतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.









