Ravi Dey Death: संगीतविश्वातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार रवि डे यांचा मृतदेह दिल्लीतील त्यांच्या भाड्याच्या खोलीत तब्बल पाच दिवसांनी आढळला. त्यांच्या निधनाची माहिती उशिराने समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार रवि डे (Musician Ravi Dey) यांच्या निधनाची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिल्लीतील गोविंदपुरी एक्स्टेंशन परिसरातील (Govindpuri Extension death) एका भाड्याच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, मृत्यू झाल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्याने सांगितले जात आहे. रवि डे हे काही काळापासून या घरात एकटेच राहत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती उशिरा समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा: तरुणांसाठी गुड न्यूज! रेल्वेत 1,421 पदांसाठी भरती; जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज
घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी संशय
१४ ऑगस्ट रोजी रवि डे राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच कालकाजी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घराला बाहेरून कुलूप असल्याने पोलिसांनी ते तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी रवि डे यांचा मृतदेह घराच्या प्रवेशद्वाराजवळ पडलेल्या अवस्थेत आढळला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील वैद्यकीय तपासणीसाठी AIIMS रुग्णालयात (AIIMS postmortem) पाठवला. १६ ऑगस्ट रोजी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
पोलिसांनी या घटनेची माहिती रवि डे यांच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र, सुरुवातीला कुटुंबीयांकडून मृतदेह स्वीकारण्याबाबत अनास्था दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुलांनी सुरुवातीला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती
रवि डे यांच्या मुलांशी पोलिसांनी संपर्क साधला असता, त्यांचा वडिलांशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांच्या हवल्याचे समोर आली आहे. त्यामुळे काही काळ मृतदेह स्वीकारण्याचा प्रश्न निर्माण झाला.
पोलिसांनी कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर कुटुंबीय मृतदेह स्वीकारण्यास तयार झाले आणि शवविच्छेदनानंतर पार्थिव त्यांच्या ताब्यात देण्यात आले. ( LS Marathi News Channel )
पाच किलोमीटर अंतरावर राहत होते कुटुंबीय
रवि डे यांच्या मुलांचे वास्तव्य त्यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लाजपत नगर परिसरात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एवढ्या जवळ राहत असूनही त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची किंवा त्यांच्या परिस्थितीची माहिती का मिळाली नाही, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
दरम्यान, रवि डे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी केली जात असून, वैद्यकीय अहवाल आणि इतर बाबींच्या आधारे मृत्यूचे कारण निश्चित केले जाणार आहे.
रवि डे यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, एका कलाकाराचा अशा प्रकारे एकटेपणात मृत्यू झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही दुःखाचे वातावरण आहे.


