Ashwini Paul Death: ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला आहे. तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत नेमकं काय घडलं? या घटनेमागचं कारण काय, जाणून घ्या संपूर्ण
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ (Ashwini Paul Death) यांनी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हेही वाचा: Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा विक्रमांचा धडाका! मिताली राजला मागे टाकत रचला इतिहास
या घटनेत अश्विनी पौळ (Ashwini Paul Death) आणि त्यांचा साडेपाच वर्षाचा मुलगा अजिंक्य यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Naldurg Fort Incident)
कोण होत्या अश्विनी पौळ?
अश्विनी मनोहर पौळ (Ashwini Paul Wrestler) या महाराष्ट्रातील नावाजलेल्या महिला कुस्तीपटू होत्या. कुस्तीच्या मैदानातील त्यांच्या दमदार कामगिरीमुळे त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी ओळख मिळाली होती. राष्ट्रीय पातळीवरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली होती. अश्विनी यांनी आपल्या कुस्ती कारकिर्दीत ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके पटकावली होती. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले होते.
घरातूनच मिळाले कुस्तीचे धडे
अश्विनी पौळ (Ashwini Paul Wrestler) यांच्या कुटुंबाची कुस्तीशी जुनी नाळ होती. त्यांच्या वडिलांसह आई, भाऊ आणि बहीण यांनाही कुस्तीची आवड होती. त्यामुळे लहानपणापासूनच अश्विनी यांना कुस्तीचे वातावरण घरातून मिळाले.
मुलीने कुस्तीमध्ये मोठं नाव कमवावं, यासाठी त्यांच्या वडिलांनी घरच्या घरीच तालीम उभी केली होती. याच ठिकाणी सराव करत अश्विनी यांनी आपल्या कुस्तीच्या प्रवासाला सुरुवात केली.
राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गाजवलं नाव
अश्विनी पौळ यांनी राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये आपली ताकद दाखवली. २००७ मध्ये तिरुवनंतपुरम, केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर २००८ मध्ये गुरुदासपूर, पंजाब आणि २००९ मध्ये चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरलं. यानंतर भोपाल, कानपूर, हरियाणा, पुण्यातील बालेवाडी, कन्याकुमारी आणि सैफई यांसारख्या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी चमकदार कामगिरी केली.
पतीही कुस्तीपटू
अश्विनी पौळ यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य कुस्तीशी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पती मनोहर पौळ हे देखील कुस्तीपटू असल्याची माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचीच कुस्तीच्या क्षेत्राशी घट्ट नाळ होती.
वडिलांचा गंभीर आरोप
दरम्यान, या घटनेनंतर अश्विनी यांच्या वडिलांनी त्यांच्या पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे.
मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. घटनेमागील नेमकं कारण काय होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे तपासातून समोर येणाऱ्या माहितीवर या प्रकरणाचं पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातून हळहळ
ज्या महिला कुस्तीपटूने आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केलं, तिचा अशा पद्धतीने झालेला अंत अत्यंत वेदनादायी आहे. अश्विनी पौळ यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रीडा क्षेत्रासह धाराशिव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.



