-प्रशांत जगताप / सातारा प्रतिनिधी
Satara Transformer Theft Case : सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतांमध्ये बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील (डीपी) कॉपर वायर चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी धीरज कैलास भोसले (वय २६, रा. वडूथ, ता. जि. सातारा) यास जेरबंद करण्यात आले असून, त्याच्याकडून चौकशीदरम्यान १४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या गुन्ह्यांतील सुमारे ५ लाख ८८ हजार रुपये किमतीची तांब्याची तार (कॉपर वायर) पोलिसांनी जप्त केली आहे.
सातारा तालुका पोलिसांकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचा छडा ( Satara Transformer Theft Case )
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमधील शेतांमध्ये असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर वायर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार पंकज ढाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार डीबी पथकाने संशयिताचा शोध सुरू केला. गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित करून पोलिसांनी संशयित धीरज भोसले यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : कोल्हापुरात बनावट शेल कंपनीच्या माध्यमातून 100 कोटींची रक्कम वळवण्याचा डाव उधळला; तिघे ताब्यात
पोलिसांच्या चौकशीत 5.88 लाखांची वायर जप्त ( Satara Transformer Theft )
चौकशीतून एकूण १४ गुन्हे उघडकीस आले असून, या गुन्ह्यांमधील सुमारे ५ लाख ८८ हजार रुपये किमतीची कॉपर वायर पोलिसांनी हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मर चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रहार पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव तसेच पोलीस अंमलदार पंकज ढाणे, मनोज गायकवाड, राजू शिखरे, दादा स्वामी, संदीप पांडव, बीट अंमलदार रामचंद्र गोरे, मालोजी चव्हाण, प्रविण वायदंडे, महिला पोलीस हवालदार मोना बोराटे, दप्तरी संदीप आवळे, पोलीस हवालदार सतीश बाबर, सुनील भोसले व संदीप फणसे यांनी केली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले









