Gadchiroli Flood : एकीकडे संपूर्ण राज्यात शेतकरी पाऊसाकडे डोळे लावून बसलाय, तर तिकडे गडचिरोलीला तुफान पाऊसानं झोडपलं…गडचिरोलीतील तब्बल 40 गावांशी संपर्क तुटलाय, त्यामुळे प्रशासनानं बचावकार्य सुरू केलंय, दरवर्षीप्रमाणे यंदाही गडचिरोलीच्या भामरागडला पुरानं वेढा घालाय, सध्या गडचिरोलीत नेमकी काय स्थिती आहे, पाहूयात…
गडचिरोलीच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा कहर ( Gadchiroli Flood )
गडचिरोलीच्या दक्षिण भागात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. भामरागड येथील पर्लकोटा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० डी वरील पर्लकोटा नदीचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. लावरून पाणी वाहू लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बॅरिकेटिंग करून वाहतूक रोखण्यात आली आहे. त्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क प्रभावित झाला आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील इंद्रावती नदीच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असून, इंद्रावतीने धोका पातळी ओलांडली आहे. पर्लकोटा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भामरागडला पुराचा वेढा पडला असताना प्रशासनाची तत्परता दिसून आली आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागडचा संपर्क तुटला असतानाच दोन रुग्णांना एसडीआरएफच्या मदतीने बोटीतून नदीपार करत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सैतू हबका आणि मालू पैडो वड्डे या दोन्ही रुग्णांना प्रथम हेमलकसा येथे हलविण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या दोन्ही रुग्णांवर अहेरी येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, छत्तीसगडमधील मुसळधार पावसामुळे इंद्रावती,पामूलगौतम आणि पर्लकोटा नद्यांना पूर आला असून दक्षिण गडचिरोलीत पूरस्थिती गंभीर बनली आहे. प्रशासन आणि एसडीआरएफची पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरू आहे. विशेष म्हणजे दक्षिण गडचिरोलीत अजूनही पावसाचा कहर सुरूच आहे.
हेही वाचा : पुण्यात DJचा दणदणाट! पोलीस आयुक्तांनी हेडफोन का लावले? 104.5 डेसिबलचा आवाज
भीमाशंकर परिसरातही मुसळधार पावसाची हजेरी ( Bhamragarh Flood )
तिकडे पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसानंतर आज मुसळधार सरी कोसळल्याने भीमाशंकर मंदिराच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी मंदिर परिसरात आले आहे. त्यामुळे मंदिराच्या सभोवती पाणी साचले आहे. सध्या भिमाशंकर मंदिर परिसरात विविध विकास कामे सुरू असून सध्या पावसामुळे ही कामे बंद ठेवण्यात आली आहे …
अनंत चतुर्दशीच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि माणगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.






