Pune IT Engineer Death : पुण्यातील उंड्री-वडाचीवाडी परिसरात 23 वर्षीय विवाहित IT इंजिनियरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
9 मे रोजी झाला होता विवाह ( Vaishnavi Ghise )
मृत विवाहितेचे नाव वैष्णवी प्रविण जरांडे असे आहे. तिचा विवाह 9 मे 2026 रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. विवाहावेळी माहेरच्या कुटुंबीयांनी मोठा खर्च केला असून सुमारे 45 लाख रुपये खर्च आणि 10 तोळे सोने दिल्याचे कुटुंबीयांनी तक्रारीत नमूद केल्याचे वृत्त आहे.
चारचाकीसाठी आणखी 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप
विवाहानंतर काही काळातच वैष्णवीकडे माहेरहून आणखी पैसे आणण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नवीन चारचाकी घेण्यासाठी 5 लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे वृत्त आहे.
या मागणीवरून पती, सासू आणि सासऱ्यांकडून मानसिक तसेच शारीरिक त्रास दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या आरोपांची सत्यता पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! तिघांची गोळ्या झाडून हत्या; अमित शाहांवर प्रश्नचिन्ह?
24 सप्टेंबरच्या रात्री आईला फोन
कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, 24 सप्टेंबरच्या रात्री वैष्णवीने आईशी फोनवर संपर्क साधून सासरी होत असलेल्या त्रासाबाबत सांगितले होते. त्यानंतर तिच्या पतीनेही माहेरच्या कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर कुटुंबीयांनी वैष्णवीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ न शकल्याने ते पुण्यात आले. त्यानंतर तिच्या मृत्यूची घटना समोर आली.
पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा ( Pune IT Engineer Death )
या घटनेनंतर वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती ओंकार संजय घिसरे, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखाली कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केलेले हुंड्याच्या मागणीचे आरोप, छळासंबंधी तक्रारी आणि घटनेपूर्वी झालेला संवाद याबाबत तपास केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.









