Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लोणीकंदमध्ये स्टोन क्रशरमध्ये 17 वर्षीय मुलाचा मृत्यू! अल्पवयीन कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गुन्हा

लोणीकंदमध्ये स्टोन क्रशरमध्ये 17 वर्षीय मुलाचा मृत्यू! अल्पवयीन कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Lonikand Stone Crusher Accident
35

सचिन धुमाळ | पुणे प्रतिनिधी 

Lonikand Stone Crusher Accident : लोणीकंद येथील साईराम स्टोन क्रशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तीन ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रिन्स विजयसिंग धुर्वे ( Prince Vijay Dhurve ) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे स्टोन क्रशरसारख्या धोकादायक उद्योगांमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याच्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रिन्स हा साईराम स्टोन क्रशरवर काम करत होता. त्यावेळी तो क्रशर मशीनमध्ये अडकला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेच्या तपासादरम्यान उपलब्ध कागदपत्रे आणि परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर पोलिसांनी दिलीप संभाजी शिळीमकर (वय ४०), सत्यजित अशोक जना (वय ३५) आणि अमित भगवान अकोलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलाला धोकादायक कामावर ठेवल्याचा पोलिसांचा आरोप ( Lonikand Stone Crusher Accident )

पोलिसांच्या आरोपानुसार, प्रिन्स हा अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याला स्टोन क्रशरसारख्या धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यात आले. तसेच हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी नेट यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून न दिल्याचा आरोप आहे. या निष्काळजीपणामुळे प्रिन्स क्रशर मशीनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेसह बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ तसेच बालक आणि किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ज्या स्टोन क्रशरवर ही दुर्घटना घडली, त्या क्रशर मालकावर गुन्हा दाखल नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. क्रशर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, कामगारांची सुरक्षितता आणि अल्पवयीन मुलाला कामावर ठेवण्याची बाब यासाठी जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : गडचिरोलीत तुफान पाऊस! भामरागडला पुराचा वेढा; अनेक गावांचा संपर्क तुटला, SDRFचे बचावकार्य

लोणीकंद परिसरातील क्रशर आणि बालकामगारांचा मुद्दा ऐरणीवर

लोणीकंद परिसरात मोठ्या संख्येने स्टोन क्रशर आहेत,यापैकी काही ठिकाणी अल्पवयीन मुले काम करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच काही क्रशरच्या परवानग्यांबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित विभागांच्या पाहणी आणि कारवाईबाबतही नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असून, संबंधित विभाग या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.
मात्र, या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी लोणीकंद परिसरातील स्टोन क्रशरची परवानगी, कामगारांची वयोमर्यादा, सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नियमांचे पालन याबाबत तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रशासनाकडून या परिसरातील क्रशर उद्योगांमध्ये सुरक्षा नियमांची आणि अल्पवयीन कामगारांच्या वापराबाबतची तपासणी केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts