सचिन धुमाळ | शिरूर प्रतिनिधी
Hamza Sheikh Death : पुन्हा एकदा भल्या सकाळी झालेल्या गोळीबाराने शिरूर तालुका हादरला आहे. कारेगाव येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लांटमध्ये कामावर गेलेल्या ३९ वर्षीय हमजा उस्मान शेख ( Hamza Usman Sheikh ) यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे कारेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हमजा शेख हे साईनगर परिसरात कुटुंबासह राहत होते. ते विकास नवले यांच्या इमारतीलगत असलेल्या ‘समु इंटरप्रायजेस अॅक्वा रिच’ या पाण्याच्या प्लांटमध्ये काम करत होते. नेहमीप्रमाणे सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ते कामासाठी प्लांटमध्ये गेले.
पाण्याच्या प्लांटमध्ये हमजा शेख रक्तबंबाळ अवस्थेत
मात्र, अवघ्या काही वेळातच धक्कादायक प्रकार समोर आला. सकाळी पावणेसातच्या सुमारास शेजारील एका महिलेने हमजा यांच्या पत्नीला पाण्याच्या प्लांटमध्ये त्यांचे पती पडले असून, त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता हमजा शेख हे रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेले आढळून आले.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांपैकी एका महिलेने काही वेळापूर्वी फटाक्यासारखा मोठा आवाज ऐकू आल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर इमारतीच्या मालकांनी रुग्णवाहिका बोलावली. हमजा शेख यांना कुटुंबीय आणि प्लांटमधील कामगारांच्या मदतीने शिरूर येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, मृतदेह शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेल्यानंतर डोक्याच्या मागील बाजूस गंभीर स्वरूपाची जखम आणि आरपार छिद्र असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.
हेही वाचा : AI मुळे 1अब्ज लोकांचे जीव जाणार? बिल गेट्स यांचा धक्कादायक इशारा
पोलिसांकडून CCTV आणि तांत्रिक तपास ( Hamza Sheikh Death )
दरम्यान, रांजणगाव MIDC पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पाण्याच्या प्लांटमध्ये गोळीची पुंगळी आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तीने पिस्तुलातून गोळी झाडून हमजा शेख यांचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हमजा शेख यांच्या पत्नी अबिताबी हामजा शेख यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३(२५) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, संभाव्य सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. गोळीबार नेमका कोणी केला? हमजा शेख यांनाच लक्ष्य करण्यामागचे कारण काय? हल्लेखोर किती होते आणि गोळीबारामागे नेमका कोणता हेतू होता? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत.
विशेष म्हणजे, मागील आठवड्यात सकाळच्या वेळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा भल्या सकाळी गोळीबाराची घटना घडल्याने शिरूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.









