वैभव पारवे | धाराशिव प्रतिनिधी
Dharashiv Farmer Suicide : पावसाअभावी सोयाबीनचे पीक हातचे गेल्याच्या धक्क्यातून धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील ३५ वर्षीय शेतकरी दयानंद संताराम राठोड यांनी आत्महत्या केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली.
दयानंद राठोड ( Dayanand Rathod ) यांनी बुधवारी सायंकाळी शेतातून सोयाबीनची काढणी करून घरी परतल्यानंतर राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. पावसाअभावी सोयाबीनचे संपूर्ण पीक वाया गेल्याने ते नैराश्यात असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : आंदोलनाच्या एक दिवस आधी अभिजीत दिपकेंसोबत घडलं असं काही; पहा मरीन ड्राईव्हचा व्हायरल VIDEO
धाराशिवच्या खानापूरमध्ये नेमकं काय घडलं? ( Dharashiv Farmer Suicide )
राठोड यांनी शेतीसाठी कर्ज मिळविण्यासाठी बँकांकडे प्रयत्न केले; मात्र CIBIL खराब असल्याचे कारण देत कर्ज मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्यांनी घरातील दागिने गहाण/विकून शेतीत पैसा खर्च केला. मात्र पावसाअभावी पीक वाया गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले.
दयानंद राठोड यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आधारच हिरावला आहे. दरम्यान, या घटनेमुळे दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. पीक नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत आणि कर्जाची उपलब्धता मिळणार कधी?, असा सवाल उपस्थित होत आहे. निसर्गाच्या संकटामुळे शेती उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष आणि तातडीच्या मदतीची गरज आहे.









