अमोल धर्माधिकारी | Pune Westin Beuro Head
Wanwadi Police Fraud Case : बनावट बँक खाती उघडून त्यांचा वापर ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी केल्याच्या प्रकरणात वानवडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात देशभरातील 19 नागरिकांची तब्बल 1 कोटी 80 लाख 15 हजार 795 रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार श्रवण राजेंद्र अंकुशे (25) याच्यासह हरिओम हरिराम साहू (24), सौद शेख (23), साहिल रौफ शेख (25) आणि तालिब नुरेमोहम्मद शेख (25) यांना अटक केली आहे.
म्युच्युअल अकाउंटच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे म्युच्युअल अकाउंट (बनावट खाते) उघडल्याचा आरोप आहे. या खात्यांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आला. या माध्यमातून देशभरातील 19 नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात एकूण ₹6,09,730 रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याची नोंद असून, विविध व्यवहारांच्या माध्यमातून एकूण ₹1,80,15,795 रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
हेही वाचा : उजनी धरणावर AI डेटा सेंटर उभारणार! ‘तीन जिल्ह्यांचं वाटोळं? काय आहे तो प्रोजेक्ट?
प्रत्येक खातेदाराला कमिशन देण्याचे आमिष? ( Pune Fraud Case )
तपासादरम्यान पोलिसांना आरोपींच्या कार्यपद्धतीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. मुख्य आरोपी श्रवण अंकुशे याने हरिओम साहू याला नागरिकांची फसवणूक करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांचा वापर करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. खाते उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक खात्यामागे ₹3,000 कमिशन, तर मुख्य सूत्रधाराला प्रत्येक खातेदारामागे ₹5,000 मिळत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
तपासात हरिओम साहू याच्या संपर्कातील सौद शेख, साहिल शेख, तालिब शेख, उबैद शेख आणि अमित रसाळ यांना त्यांच्या नावाने बँक खाती उघडून वापरण्यास दिल्याची माहितीही समोर आली आहे. त्याबदल्यात खातेदारांना रक्कम देण्यात येत असल्याचा आरोप आहे.
19 नागरिकांची फसवणूक ( Wanwadi Police Fraud Case )
पोलिसांच्या तपासानुसार, या बनावट खात्यांच्या माध्यमातून भारतातील विविध ठिकाणच्या 19 नागरिकांची फसवणूक करण्यात आली. फसवणुकीतून मिळालेली रक्कम आरोपींनी वापरलेल्या बनावट बँक खात्यांमध्ये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 343/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 112(2), 61(2), 318(4), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कागदपत्रात नमूद आहे.
पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. न्यायालयाने आरोपींना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, बनावट खाती नेमकी किती उघडण्यात आली आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास वानवडी पोलीस करत आहेत.









