Grishneshwar Temple : छत्रपती संभाजीनगर मधील 12 वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि वेरूळ लेणी परिसरात लवकरच मोठे बदल पाहायला मिळणार आहेत….पुढील सहा महिन्यात नवीन क्लस्टर तयार होणार असून त्यामध्ये येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांची गैरसोय टळणार आहे… प्रशस्त वाहनतळ, व्यापारी संकुल, हॉटेल, मोठा रस्ता, भाविकांना जाण्यासाठी विशेष बोगदा असे नियोजन करण्यात आले आहेत… तर मंदिराच्या आतमध्ये भाविकांसाठी दर्शन रांग नियोजन आणि इतर विकास काम हाती घेण्यात आले आहे… तयार करण्यात येणारा बोगदा तीन महिन्यात पूर्ण होईल, तर मंदिराच्या कामाला सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने मंदिर सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे… मात्र त्याला व्यवसायिकांनी विरोध केला आहे, सहा महिने व्यापार बंद राहिल्यास उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न व्यवसायिकांनी उपस्थितीत केलाय.
घृष्णेश्वर मंदिर परिसरात नेमका कोणता विकास होणार? ( Grishneshwar Temple )
बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणून घृष्णेश्वर मंदिराला मान्यता आहे… जोपर्यंत या मंदिरात दर्शन होत नाही तोपर्यंत महादेवाच्या श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिर्लिंगाची परिक्रमा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे… त्यामुळे दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी वेरूळ येथे दाखल होतात… हे एकमेव असे देवस्थान आहे जिथे शिवलिंगाचे प्रणाली पूर्वाभिमुख आहे त्यामुळे त्याचे विशेष महत्त्व हे मानले जाते..
देशात असणाऱ्या भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे स्थान असणाऱ्या घृष्णेश्वर मंदिराचा कायापालट होत आहे… सध्याच्या परिस्थितीनुसार अरुंद रस्ता असल्याने वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे… त्यात रस्ता ओलांडताना होणारे अपघात देखील चिंतेचा विषय झाल्याने तेथील विकासकामे हाती घेण्यात आले… मंदिरापासून जवळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात लेणी क्रमांक 1 पासून एक नवीन रस्ता तयार करण्यात आलाय, त्या मार्गाने थेट मंदिराजवळ असलेल्या गट क्रमांक 4 मध्ये भव्य वाहनतळ उभारण्यात आले आहे… वाहन लावल्यावर तिथे मोठे भक्त निवास सज्ज झाले आहे… मंदिराकडे येताना पाहिले व्यापारी संकुल तयार करण्यात आले आहे, तिथून मंदिराकडे निघाल्यावर 40 मीटरचा बोगदा रस्ता ओलांडण्यासाठी तयार करण्यात येत आहे… सध्या मंदिर परिसरात असलेले अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले आहे…. शिवाय परिसरात कोणतंही दुकान असणार नाही, मंदिर पूर्णपणे मोकळे असेल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सौरभ चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा : फ्लाईदुबाईच्या विमानात थरार! पायलटवर चाकूहल्ला, अचानक हजारो फूट खाली आलं विमान; नेमकं काय घडलं?
घृष्णेश्वर मंदिराजवळ भुयारी मार्ग का तयार केला जात आहे? ( Grishneshwar Jyotirlinga )
घृष्णेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी व्यवसाय करत आहेत, मंदिरातील विकास कामांमध्ये त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे… 2018 सुमारास त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले, जे व्यावसायिक व्यवसाय करतात त्यांची नोंद घेण्यात आली… त्यांनंतर मंदिराच्या बाहेरील बाजूस भक्त निवास शेजारी मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले, त्यात 172 व्यावसायिकांना व्यवसाय करता येणार आहे… हार – फुल विकणारे, मूर्ती विकणारे, शोभेच्या वस्तू विकणारे अशा व्यवसायांना एकाच संकुलात व्यवस्था करून देण्यात आली आहे… मंदिर परिसरात कोणताही व्यवसाय करण्यास मनाई करण्यात येणार आहे…
वेरूळ लेणी आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना मिळेल दिलासा..
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर हे जवळ आहेत…त्यामुळे मंदिरात येणारा भाविक लेणी पाहण्यासाठी आवर्जून जातो… त्यामुळे येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मंदिराचा विकास सुरू करण्यात आलाय… नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळ्याच्या धर्तीवर सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवण्यात आला आहे… नाशिकमध्ये येणारे भाविक घृष्णेश्वरच्या दर्शनाला येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आल्याने, येणारी गर्दी लक्षात घेऊन कामे केली जात आहेत… या कामांचा फायदा वेरूळ येथे येणाऱ्या पर्यटकांना देखील होणार आहे, वाहतुकीचे योग्य नियोजन होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे… तिथे असलेले उद्यान, लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर याचे वैशिष्ट्यपूर्ण क्लस्टर तयार होणार आहे…
घृष्णेश्वर मंदिर सहा महिने बंद राहणार का? ( Grishneshwar Temple Development )
मंदिर परिसरात भुयारी मार्ग तयार होणार असल्याने मंदिर सहा महिने बंद राहणार आहे, त्यामुळे व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे… सहा महिने व्यवसाय बंद झाल्यास उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न व्यावसायिक असलेल्या महिलांनी उपस्थितीत केलाय…. मंदिराला चार दरवाजे आहेत, कामासाठी तीन दरवाजे बंद ठेवावेत, मात्र एक दरवाजा उघडा ठेऊन भाविकांना आत जाऊ द्यावे, त्यामुळे हार फुलाचा व्यवसाय सुरू राहील अशी विनंती महिला व्यावसायिकांनी केली आहे…तर यावर स्पष्टीकरण आलंय की भुयारी मार्गामुळे मंदिर बंद होणार नाही, मंदिराच्या आतमध्ये काम करायचे असल्याने मंदिर सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे…
बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिराच्या कायापालटमुळे या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे…तसंच भाविकांना चांगल्या सुविधा देखील मिळणार आहे…घृष्णेश्वर मंदिर परिसरात आधी अतिक्रमणामुळे भाविकांना काही अडचणींचा सामना करावा लागत होता…मात्र आता भाविकांना चांगल्या सुविधा मिळणार आहे…पण व्यावसायिक महिलांचा विरोध आता प्रशासन कसं दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे….









