• Home
  • ताज्या बातम्या
  • हरिश्चंद्रगडावर तरुणाचा मृतदेह शोधताना दुसरा सांगाडा सापडला; नेमकं काय घडलं?
गुन्हा

हरिश्चंद्रगडावर तरुणाचा मृतदेह शोधताना दुसरा सांगाडा सापडला; नेमकं काय घडलं?

Harishchandragad Incident
31

Harishchandragad Incident : शोधायला गेले एक… आणि सापडले दोन, महाराष्ट्रातील ट्रेकर्सचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर (Harishchandragad) नुकतीच एक थरारक करणारी घटना घडली आहे. लग्नाला अवघे 8 महिने झालेल्या एका तरुणाने १७०० फूट खोल दरीत उडी मारून आपले आयुष्य संपवले. पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीम जेव्हा त्याचा मृतदेह शोधण्यासाठी ८०० फूट खोल दरीत उतरली, तेव्हा तिथे फक्त त्या तरुणाचा मृतदेहच नाही, तर शेजारी आणखी एक सांगाडा सापडला… उडी मारणारा तो तरुण नेमका कोण होता? त्याने उडी मारण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या १३ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कोणते धक्कादायक आरोप केले आहेत? त्या खोल दरीत सापडलेला दुसरा सांगाडा कोणाचा आहे?

हरिश्चंद्रगडावर नेमकी काय घटना घडली? (Harishchandragad Incident)

सुरुवात करूया या घटनेच्या मूळ कथेपासून. विश्वराजसिंह मयुरसिंह गोहिल (Vishwarajsinh Gohil). वय २७-२८ वर्षांचा हा तरुण गुजरात राज्यातील भावनगर येथील रहिवासी होता. विश्वराजसिंह हा सरकारी नोकरीत म्हणजेच टपाल विभागात कार्यरत होता. विश्वराजसिंह यांचा विवाह ८ फेब्रुवारी २०२६ रोजी धाराबा अजयसिंह सरवैया यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यावर एका नव्या आयुष्याची, सुखी संसाराची स्वप्ने त्यांनी पाहिली होती. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस ठीक गेल्यानंतर, विश्वराजसिंह आणि त्यांच्या पत्नीमध्ये खटके उडू लागले. हा वाद हळूहळू इतका विकोपाला गेला की पत्नी आणि सासरच्या लोकांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जाऊ लागल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्यात रोजचे वाद, भांडणे आणि कौटुंबिक मतभेद वाढले. हा कौटुंबिक वाद केवळ घरापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. भारतीय कायद्यातील कलम ४९८ अ (हुंडा छळ प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची किंवा त्यात अडकवण्याची भीती आणि मानसिक दबाव त्यांच्यावर सातत्याने वाढत गेला. कायदेशीर कचाट्यात अडकल्यामुळे समाजात होणारी बदनामी आणि करिअर उद्ध्वस्त होण्याची भीती यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली आला होता….

हेही वाचा : मोठी बातमी! आता कोट्यवधी मुलांना मिळणार SpaceX च्या मालकीत हिस्सा? Elon Musk यांच्या प्लॅनमागचं कारण काय?

तरुणाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओतील आरोपांची चौकशी होणार?

या मानसिक त्रासाला कंटाळून विश्वराजसिंह घर सोडून महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगडावर (Harishchandragad) पोहोचला. तिथे टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा १३ मिनिटांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मनातील संपूर्ण वेदना व्यक्त केली. त्यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले. व्हिडिओमध्ये अत्यंत भावूक होऊन तो म्हणाला, जर तुम्हाला मुलगा असेल आणि तुम्हाला त्याचे भविष्य उद्ध्वस्त करायचे नसेल, तर हा व्हिडिओ शेअर करा,. ४९८ अ सारख्या कायद्यांचा गैरवापर निष्पाप लोकांचे जीव घेत आहे. मी तुमच्या पाया पडतो, मला न्याय द्या.

तो व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर, विश्वराजसिंह यांनी कोकणकड्याच्या १७०० फूट खोल दरीमध्ये झोकून दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम राबवून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. राजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून विश्वराजसिंहची गुजरात पासिंग असलेली दुचाकी, त्याचा मोबाईल फोन आणि काही वैयक्तिक साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांना मोबाईल तपासताना हा १३ मिनिटांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ सापडला, जो आता या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा बनला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, व्हिडिओमधील गंभीर आरोप पाहता, राजूर पोलीस आणि अहिल्यानगर पोलीस हे हे प्रकरण पुढील तपासासाठी गुजरात पोलिसांकडे सोपवण्याची शक्यता आहे, कारण मूळ कौटुंबिक वाद आणि छळाची घटना गुजरातमध्ये घडली होती. या व्हिडिओच्या आधारे विश्वराजसिंहच्या पत्नी आणि सासरच्या लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

हेही वाचा : मित्राशी प्रेमसंबंध, मुलगी गर्भवती, हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?

पोलिसांचा तपास सुरू; डीएनए चाचणीतून ओळख पटणार?

मात्र पोलीस एक सांगाडा तपासायला गेले तिथे अजून एक सांगाडा सापडला, प्राथमिक तपासानुसार, हा सांगाडा पुण्याचा रहिवासी असलेल्या गणेश सोनार या तरुणाचा असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गणेश सोनार हा काही महिन्यांपूर्वी हरिश्चंद्रगड (Harishchandragad) परिसरात ट्रेकिंगसाठी आला होता आणि तिथून तो अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती. कोकणकड्याच्या इतक्या खोल दरीत उतरणे सामान्य माणसाला किंवा पोलिसांना सहजासहजी शक्य होत नाही. जर आज विश्वराजसिंहच्या आत्महत्येची घटना घडली नसती आणि रेस्क्यू टीम तिथे उतरली नसती, तर कदाचित गणेश सोनारचा तो सांगाडा कधीच जगासमोर आला नसता. निसर्गाच्या कुशीत दडलेले हे एक भयानक रहस्य या निमित्ताने उघड झाले आहे. पोलीस आता या सांगाड्याची डीएनए चाचणी करून अधिकृत ओळख पटवणार आहेत.

घरगुती वाद, खोट्या केसेसची भीती आणि मानसिक छळ यामुळे एका हसत्याखेळत्या तरुण सरकारी कर्मचाऱ्याचा असा अंत होणे अत्यंत दुर्दैवी आहे. कायदे हे रक्षणासाठी असावेत, कोणाचा बळी घेण्यासाठी नाही, हाच संदेश विश्वराजसिंहने आपल्या मृत्यूच्या आधी दिला आहे. पण त्याच वेळी, परिस्थिती कितीही कठीण असो, कायदेशीर किंवा कौटुंबिक मानसिक त्रास कितीही मोठा असो, आत्महत्या हा कधीच कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts