Shiv Sena Dussehra Melava : मुंबईत दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावा…आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापलं… आम्ही फक्त भाषण देणारे नाही, तर शेतकऱ्यांना रेशन देणारे आहोत… तुम्ही आमच्यावर कितीही आरोप करा, कितीही शिव्या द्या, आम्ही तुम्हाला कामातून उत्तर देऊ… शेतकऱ्यांची पिकं करपून गेली असताना तुम्ही मुंबईत मोर्चे काढता, पण संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला साधा बिस्किटाचा पुडा तरी दिलात का? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
आज मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत, पाच हजार रुपयांचं अर्थसाहाय्य, कर्जमाफी आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणावरून शिंदेंनी जोरदार टीका केली. एवढंच नाही, तर २०१९ मध्ये झालेल्या सत्तांतरावरूनही त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं.
ठाकरे VS शिंदे: दसरा मेळाव्यात शेतकरी मदतीवरून आरोप-प्रत्यारोप (Thackeray vs Shinde)
महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडलाय, तर दुसरीकडे याच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शेतकरी मदतीवर प्रश्न उपस्थित केले, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करत असल्याचा दावा केला. आम्ही केवळ भाषणं देत नाही, तर शेतकऱ्यांना रेशन देतो. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहिले. त्यांचं दुःख समजून घेतलं. मात्र, विरोधक संकटाच्या काळातही राजकारण करत असल्याचा आरोप शिंदेंनी केला…
हेही वाचा : मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचा आरोप; ऑडिओ क्लिपबाबत काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका ( Shiv Sena Dussehra Melava )
तुमचा एकही दिवस मला शिव्या दिल्याशिवाय जात नाही. तुम्ही आरोप करा, टीका करा, शिव्या द्या, पण आम्ही त्याला कामातून उत्तर देणार आहोत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही ट्रकभर साहित्य पाठवलं. पण तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर साधा बिस्किटाचा पुडा तरी घेऊन गेलात का? असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांची उभी पिकं करपून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना विरोधक मुंबईत मोर्चे काढत आहेत. शेतकऱ्यांच्या संकटाचं राजकारण करण्याऐवजी त्यांच्या मदतीला धावून जा, असं आवाहनही त्यांनी केलं. पाच हजार रुपयांनी काय होणार, असा सवाल विरोधक विचारत आहेत. मात्र, ही संपूर्ण नुकसानभरपाई नसून शेतकऱ्यांना तातडीचा आधार देण्यासाठीची मदत असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. तसेच शेतकरी कर्जमाफीसाठी ३२ हजार कोटी रुपयांचं नियोजन केल्याचा दावा शिंदेंनी आपल्या भाषणात केला.
2019 मधील सत्तांतरावरून ठाकरेंना लक्ष्य
भाजपसोबत निवडणूक लढवून नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करणं हा मतदारांचा विश्वासघात असल्याचा आरोप शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला… मागच्या दाराने मुख्यमंत्री झालात, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच मतचोरीच्या आरोपांवरून विरोधकांना लक्ष्य करत २०१९ मधील सत्तास्थापनेवर प्रश्न उपस्थित केले.
आता एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला आरोपाला उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देणार? महायुती सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती रूपयांची मदत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…









