Itha Movie Record: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात श्रद्धा महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी ‘विठाबाई नारायणगावकर’ यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे लाखो कलावंत या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘ईठा’ने एक ऐतिहासिक कामगिरी करत ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव कोरले आहे.
पुण्यात रंगला लावणीचा अनोखा विक्रम (Itha Movie Record)
नुकताच पुण्यातील झील युनिव्हर्सिटीमध्ये ‘ईठा’ चित्रपटाचा भव्य प्रमोशनल इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमाला श्रद्धा कपूर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर स्वतः उपस्थित होते. यावेळी पारंपरिक वेशभूषेत आलेल्या शेकडो महिलांनी एकत्र येत चित्रपटातील ‘जी जी रे जी’ या गाण्यावर एक मिनिट सलग लावणीची हुक स्टेप सादर केली. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी लावणी सादर केल्याने या उपक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ (Itha Movie Asia Book of Records) मध्ये घेण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या रेकॉर्ड्सच्या अधिकाऱ्यांनी या नव्या विक्रमाची अधिकृत घोषणा केली आहे.
श्रद्धा कपूरच्या मराठमोळ्या लूकने वेधले लक्ष
या प्रसंगी ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या अधिकाऱ्यांकडून श्रद्धा कपूर, लक्ष्मण उतेकर तसेच ‘मॅडॉक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘कठपुतली क्रिएशन्स महाराष्ट्र’च्या टीमला सन्मानचिन्ह, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यासाठी श्रद्धाने हिरव्या रंगाची पारंपरिक नऊवारी साडी, मराठमोळे दागिने आणि कोल्हापुरी चप्पल असा खास लूक केला होता. तिने स्वतः स्टेजवर ‘जी जी रे जी’ गाण्यावर ठेका धरत उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. तसेच सहभागी महिलांसोबत फोटोदेखील काढले.
हेही वाचा : अमृता खानविलकरच्या ‘अमुल्य बाय अमृता’ ब्रँडची फोर्ब्स इंडियाकडून दखल!
गाण्यासाठी श्रद्धाने ८ किलोचे घुंगरू बांधून केला सराव
विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर (Vitabai Narayangaonkar Biopic) यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ मधील ‘जी जी रे जी’ हे गाणे १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाले. ज्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वैभवी मर्चंट यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाचा किस्सा सांगताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी नमूद केले की, या गाण्यासाठी श्रद्धाने पायात प्रत्येकी ४ किलो म्हणजेच एकूण ८ किलो वजनाचे घुंगरू बांधून सराव केला होता. या सरावामुळे तिच्या पायाला सूज येऊन स्नायू दुखावले होते. परिणामी तिला महिनाभर विश्रांती घ्यावी लागली होती.
येत्या ४ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा, सिद्धार्थ जाधव आणि मोहम्मद झीशान अय्यूब यांसारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.









