नवी दिल्ली LPG Cylinder : घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण 1 मे पासून देशभरात एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग आणि डिलिव्हरीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. तेल कंपन्या गॅसचा काळाबाजार आणि गैरवापर रोखण्याच्या उद्देशानं सरकार नवीन नियम लागू करण्याची तयारी करत आहे. या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. नव्या नियमांनुसार आता सिलिंडर मिळवण्यासाठी केवळ बुकिंगच नाही, तर ओटीपी व्हेरिफिकेशन देखील आवश्यक असेल. तसंच, बुकिंगची वेळ आणि किमतींमध्येही बदल दिसू शकतात.
हेही वाचा : ‘Mythos’ AI तुमच्या बँक खात्यांना मोठा धोका, अर्थ खात्याच्या सूचना
ओटीपीशिवाय सिलेंडर मिळणार नाही :
नवीन नियमांनुसार प्रत्येक एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी ओटीपी वापरुन केली जाईल. गॅस बुकिंग केल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल, जो डिलिव्हरीच्या वेळी सांगणं आवश्यक असेल. यामुळं फसवणुकीच्या डिलिव्हरी आणि गॅस चोरी रोखण्यास मदत होईल.
बुकिंगच्या वेळेतही होणार वाढ :
नव्या नियमांनुसार गॅस बुकिंगची वेळही वाढवण्यात आली आहे. शहरांमध्ये ही वेळ 21 दिवसांवरुन 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवस करण्यात आली आहे. तसंच अंतिम मुदतीपूर्वी केलेली बुकिंग सिस्टीमद्वारे आपोआप नाकारली जाईल.
किंमतींमध्येही बदल होण्याची शकत्या :
अलीकडेच, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळं एलपीजीच्या दरात वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात आधीच वाढ झाली असून, 1 मे पासून आणखी दरवाढ अपेक्षित आहे, ज्यामुळं ग्राहकांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.
आधारची ई-केवायसी आवश्यक :
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार-आधारित ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही, त्यांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी लागेल, अन्यथा त्यांना समस्यांना सामोरं जावं लागू शकते. ग्राहकांना त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या एलपीजी खात्याशी लिंक करण्याचा आणि ‘मायएलपीजी’ पोर्टलला भेट देऊन पुढील बुकिंगची तारीख तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






