मुंबई Missing Link Project : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी खुला होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं उद्घाटन करतील. नुकतंच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयारीचा आढावा घेण्यासाठी याठिकाणी भेट दिली होती. या प्रकल्पाच्या उद्घाटनामुळं, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित महामार्ग बनेल.
हही वाचा : वातावरण तापलं! अयान व्हिडिओ प्रकरणानंतर परतवाडात राणेंची सभा
काय आहे मिसिंग लिंक प्रकल्प? :
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या घाट विभागात एक असा भाग होता, जिथं सतत वाहतूक कोंडी आणि अपघात होत असत. हा भाग टाळण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प तयार करण्यात आला. यात आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळं हा देशातील सर्वात आधुनिक रस्ते प्रकल्पांपैकी एक बनला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करताना, खंडाळा घाटाच्या वळणदार आणि तीव्र उतारामुळं अनेकदा वाहतूक कोंडी, अपघात आणि पावसाळ्यात दगड कोसळण्याचा धोका निर्माण होतो. ही समस्या कमी करण्यासाठी, सरकारनं डोंगरांमधून एक ‘शॉर्टकट’ म्हणजेच ‘मिसिंग लिंक’ बांधला आहे.
या मिसिंग लिंक प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्यं :
- हा प्रकल्प 10.5 किमी लांबीचा असून, यात दोन मोठे बोगदे बांधण्यात आले आहेत.
- टायगर व्हॅलीवर 182 मीटर उंचीचा केबल-स्टेड ब्रिज बांधण्यात आला आहे.
- या प्रकल्पासाठी आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
- हा पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित मार्ग आहे.
- ताशी 70 किमी वेगानं सोसाट्याचे वारे, मुसळधार पाऊस आणि खडतर भूभाग असूनही हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला.
मिसिंग लिंकमुळं प्रवाशांना काय फायदा होणार? :
हा प्रकल्प सुरु झाल्यावर, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वात मोठा फायदा वेळेची बचत हा होईल. याशिवाय, घाटावरील वाहतूक कमी होईल, अपघात कमी होतील आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक फायदा असा आहे की, मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सुरु होऊनही टोलमध्ये कोणतीही नवीन वाढ होणार नाही. यामुळं चारचाकी वाहनं आणि बसेसची वाहतूक शक्य होईल.
या प्रकल्पाला मिसिंग लिंक असं नाव का पडलं? :
वास्तविक 1995 मध्ये, तत्कालिन महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना आघाडी सरकारनं मुंबई ते पुणे असा देशातील पहिला द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुण्यातील खंडाळा घाट विभागाच्या भौगोलिक रचनेमुळं, त्याचा एक मोठा भाग अपूर्ण राहिला. परिणामी, वाहतूक जुन्या राष्ट्रीय महामार्ग 4 (आता राष्ट्रीय महामार्ग 48) वर वळवण्यात आली. हा अपूर्ण भाग नंतर ‘मिसिंग लिंक’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
मिसिंग लिंक प्रकल्प 27 वर्षे का रखडला? :
हा मिसिंग लिंक प्रकल्प 27 वर्षांपूर्वी 1999 मध्येच सुरु करण्यात आला होता, परंतु भौगोलिक आव्हानं आणि प्रशासकीय कारणांमुळं तो बराच काळ रखडला होता. यानंतर 2014 साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 2015 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या कामाला पुन्हा गती मिळाली आता अखेरीस 2026 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.











