Amravati robbery exposed : अमरावती शहरातील कठोरा रोडवरील सुमित्रा ज्वेलर्स दरोडा प्रकरणी अमरावती शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गुन्हा उघड करत ७ आरोपींना अटक केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा – शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराज्यातील डंपर चोरी करणारी टोळी जेरबंद
१३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास सुशांत शेरेकर हे दुकान बंद करून बालाजी नगरकडे जात असताना काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यानंतर ३ ते ४ आरोपींनी चाकूचा धाक दाखवत ४५० ग्रॅम सोने व १.७० लाख रुपये रोख असलेली बॅग लंपास केली होती. प्राथमिक तपासात एकूण सुमारे ३६.३७ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
आयुक्त ओला यांनी सांगितले की, गाडगे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच १२ विशेष पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हेगारांसह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत १.०५ कोटी), २.२२ लाख रुपये रोख, एक चारचाकी वाहन, दोन मोटारसायकली, तीन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण १ कोटी १२ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
‘सराफा व्यावसायिकांनी मोठ्या रकमेची वाहतूक करताना खबरदारी घ्यावी. शहरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे,’ असं आयुक्त ओला यांनी स्पष्ट केले. पुढील तपास सुरू आहे.











