विशाल रेवडेकर | सिंधुदुर्ग प्रतिनिधी
Diveagar Beach Students Death : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे समुद्रकिनारी सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दिवेआगर समुद्रकिनारी नेमकं काय घडलं? ( Diveagar Beach Students Death )
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. या सहलीमध्ये ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे एकूण ४४ जण सहभागी झाले होते. समुद्रकिनारी फिरत असताना काही विद्यार्थी अचानक खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. बुडालेल्या विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढून उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : कॅप्टन स्मित मच्छार कोण आहेत? 174 प्रवाशांचे प्राण कसे वाचवले? विमानातील थरारक घटना
दिवेआगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 8 विद्यार्थ्यांची नावे
या दुर्घटनेत राजवीर वाहिले, सोहम भांडवळकर, कौस्तुभ दोंड, यश वानखेडे, कैवल्य वासंकर, तन्मय वाहिले, सुमित अहिरे आणि प्रणव बनसोडे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
देवगडच्या 2023 दुर्घटनेत काय घडलं होतं? ( Diveagar Beach )
दरम्यान, दिवेआगरमधील या दुर्घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रकिनारी घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्याची आठवण होत आहे. ९ डिसेंबर २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड येथील खासगी सैनिक अकॅडमीची सुमारे ३५ विद्यार्थ्यांची सहल देवगड येथे आली होती. यावेळी समुद्रात उतरलेल्या सहा विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.
समुद्रकिनारी सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी, प्रशिक्षित सुरक्षा यंत्रणा आणि समुद्रातील धोकादायक ठिकाणांबाबत योग्य सूचना देण्याची गरज या दोन्ही दुर्घटनांमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. दिवेआगर दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून पुढील कारवाई आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे आता लक्ष लागले आहे.





