Hidayat Patel murder case update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हिदायत पटेल यांच्यावर काल अकोल्यात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला होता. राजकीय आणि कौटूंबिक वादातून उबेद पटेल या तरूणाने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. त्यांनतर मारेकरी फरार असून संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून दिलं आहे. तर दुसरीकडे हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे
हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी राजकीय नेत्यांचा हात असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बदरुज्जामा,काँग्रेस पदाधिकारी राजू बोचे, काँग्रेसचे पदाधिकारी संजय बोडखे, फाजिल खान आणि फारूक खान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. हिदायत पटेल यांनीच आपल्याला सांगितल्याचा दावा हिदायत पटेल यांचे पुतणे यांनी केला. जोपर्यंत या पाच जणांना याप्रकरणी अटक होत नाही तोपर्यंत आपण अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात मृतदेह ठेवू असा इशारा त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा : राहुरी–शनिशिंगणापूर रस्त्यावर रीक्षा-टॅव्हल्सचा भीषण अपघात; 4 ठार तर सुमारे 10 जखमी
काकाच्या खुनाचा बदल्या घेतल्याचा संशय
24 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोहाळा येथे भाजप अल्पसंख्याक सेलचे माजी पदाधिकारी मतीन शेरखाँ पटेल (58) यांची हत्या झाली होती. या प्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशातून हिदायत पटेल यांच्यावर मृत मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती गावातील काही प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली. आमचा त्या दिशेने तपास सुरू आहे, असे अकोट पोलिसांनी सांगितले.
पोलीस तपास सुरु
या प्रकरणातील काही आरोपी सद्या फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेतला जात असून हा हल्ला पूर्ववैमान्यस्य आणि कौटुंबिक वादातून झाल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे. यामागचं आणखी काही कारण आहे का याचा तपास पोलीस करत असून हिदायत पटेल यांच्या कुटुंबाने काही राजकीय लोकांची नावे घेतली आहेत, त्याचाही तपास पोलीस करत असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी यांनी सांगितले आहे.
कोण आहे हिदायत पटेल
हिदायत पटेल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते. त्यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचा एक आक्रमक आणि महत्त्वाचा चेहरा म्हणून हिदायत पटेल यांची ओळख आहे.












