marriage function accident : हिंगोली ते बुलढाणा अंतर जेमतेम काही किलोमीटरचं. पण या दोन जिल्ह्यांतून एका आठवड्यात आलेल्या बातम्या काळजात कालवाकालव करणाऱ्या आहेत. कुठं बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवानं आयुष्य संपवलं, तर कुठं अक्षता पडण्यापूर्वीच आगीनं राखरांगोळी केली. हे सारं पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो, राव काय चाललंय हे? नेमकं काय झालं कसं झालं जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधून, लग्नांवर विघ्न.मंडप पेटला. दोन नवरदेवांचे मृतदे. नेमकं चाललंय काय ..?
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वाघजाळी गाव. सनई-चौघड्यांचे सूर घुमण्याची तयारी सुरू होती. आनंद हरिभाऊ गांधिले या तरुणाचं अवघ्या दोन दिवसांवर लग्न होतं. घरात पाहुणेरावळे जमले असतील, हातावर मेहंदी चढलीही असेल, पण अचानक एक बातमी आली अन गाव सुन्न झाला. भावी नवरदेवानं, आनंदनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांचा पंचनामा सुरू आहे, पण ज्या हातांनी बाशिंग बांधायचं होतं, त्याच हातानं मृत्यूचा फास का जवळ केला ? याचं उत्तर अजूनही कोणाकडेच नाही. एका बापाचं स्वप्न आणि एका मुलीचं भविष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं.
मृतदेह एका विहिरीत आढळून आलाय
तर आज पुन्हा दुसरी घटना समोर आलीये. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातच वायचाळ पिंपरी याठिकाणी लग्नाच्या अवघ्या तीन दिवस आधी भावी नवरदेव ओम अशोक वायचाळ यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारपासून ओम हा बेपत्ता झाला होता. आज अखेर त्याचा मृतदेह आडगाव शिवारातील एका विहिरीत आढळून आलाय. १४ मे रोजी विवाह सोहळा निश्चित झाला होता. शनिवारपासून तरुण घरातून बेपत्ता होता. आणि शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मंडप थेट हाय टेन्शन लाईनलला जाऊन भिडला
अन तिसरीकडे, बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील कंडारी येथे लग्नाचा उत्साह होता. पाहुणे मंडळी जेवणात रंगली होती, पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक आलेल्या वावटळीनं कापडी मंडप थेट हाय टेन्शन लाईनलला जाऊन भिडला. स्पार्किंग झालं आणि पाहता पाहता लग्नाचा मंडप पेटला…या आगीमध्ये एक इलेक्ट्रिक बाईक आणि लाखोंचा मंडप जळून खाक झाला. वऱ्हाड्यांची पळापळ झाली, जीव वाचवण्यासाठी धावपळ सुटली. सुदैवानं जीवितहानी टळली, पण लाखोंचं आर्थिक नुकसान एका क्षणात डोळ्यांसमोर घडलं.
लग्नाचा खर्च, कर्ज, किंवा जोडीदाराबद्दलची भीती
लग्नाचा मोसम सध्या जोरात आहे. पण एकाच आठवड्यात दोन तरुण नवरदेवांचे मृत्यू आणि या आगीच्या घटना. हे खूप काही सांगून जात आहेत. लग्नाचा खर्च, कर्ज, किंवा जोडीदाराबद्दलची भीती. यापैकी काहीही असो, मृत्यू हे कधीच उत्तर असू शकत नाही. वाघजाळीच्या त्या तरुणाने टोकाचं पाऊल का उचललं, हे पोलीस शोधतीलच, पण समाजातील तरुणांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, तुमचं जाणं तुमच्या कुटुंबासाठी कायमची जखम देऊन जातं.
एकाच आठवड्यात दोन भावी नवरदेवांचा मृत्यू
हिंगोलीत एकाच आठवड्यात दोन भावी नवरदेवांचा मृत्यू आणि मंडप जळणे यावरून एकाच प्रश्न उभा राहतोय कि नेमक चालली काय ? एकतर आत्ता पोरांना पोरी मिळत नाहीयेत, कितीतरी पोरांची लग्न पोरी मिळत नाहीत म्हणून खोळंबली आहेत, आणि ज्यांचे लग्न ठरलेत त्यांचा संशयास्पद मृत्यू होतोय यामागे नेमकं कारण काय ? हिंगोलीत त्या कुटुंबांच रडणं आणि बुलढाण्यात जळालेला तो मांडव. हे दृश्य सुन्न करणारं आहे. लग्न हे दोन जीवांचं, दोन कुटुंबांचं मिलन असतं, पण सध्याच्या बातम्या पाहता लग्नात विघ्न आता चिंतेचा विषय ठरतोय की काय, अशी भीती वाटतेय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा.












