Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • तिरुपती देवस्थानाकडून आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण; ‘गोविंदा रे गोविंदा’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला!
संस्कृती

तिरुपती देवस्थानाकडून आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण; ‘गोविंदा रे गोविंदा’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला!

Tirupati Devasthan Ambabai Shalu
1

निरंजन कामत । कोल्हापूर प्रतिनिधी

Tirupati Devasthan Ambabai Shalu : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तिरुपती देवस्थानाकडून देवीला मानाचा रेशमी शालू अर्पण करण्यात आला. तब्बल १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा हा रेशमी शालू पारंपरिक पद्धतीने देवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी तिरुपती देवस्थानचे प्रतिनिधी कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘गोविंदा रे गोविंदा’ आणि ‘अंबाबाईचा उदो उदो’ या जयघोषामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला.

अनेक वर्षांची परंपरा यंदाही कायम ( Tirupati Devasthan Ambabai Shalu )

शारदीय नवरात्रोत्सवात दरवर्षी तिरुपती देवस्थानाकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. घटस्थापनेनंतर आणि अष्टमीपूर्वी हा शालू देवीला अर्पण केला जातो. यंदाही या परंपरेनुसार शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तिरुपती देवस्थानच्या प्रतिनिधींनी मानाचा शालू घेऊन श्री अंबाबाई मंदिराकडे प्रस्थान केले.

भवानी मंडप येथून पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक श्री अंबाबाई मंदिरात दाखल झाली. मिरवणुकीदरम्यान भाविकांनी ‘गोविंदा रे गोविंदा’ आणि ‘अंबाबाईचा उदो उदो’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला. या धार्मिक सोहळ्यामुळे नवरात्रोत्सवातील उत्साहात आणखी भर पडली.

हेही वाचा : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमीला आई अंबाबाई वैष्णवी रूपात सजली; जाणून घ्या या रूपाचे धार्मिक महत्त्व!

जिल्हाधिकाऱ्यांकडे मानाच्या शालूचा स्वीकार ( Tirupati Ambabai Shalu )

तिरुपती देवस्थानाचे सुपरिटेंडंट डी. मोहन राव यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी हा मानाचा रेशमी शालू स्वीकारला. देवीला मानाचा शालू अर्पण करण्याची ही परंपरा दोन्ही देवस्थानांमधील धार्मिक आणि सांस्कृतिक नात्याचे प्रतीक मानली जाते.

नवरात्रोत्सवाच्या काळात आई अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. अशा भक्तिमय वातावरणात तिरुपती देवस्थानाकडून अर्पण करण्यात आलेल्या मानाच्या शालूमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts