Jio IPO 2026 : 15 ऑक्टोबरला रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओची अधिकृत माहिती समोर आली आणि देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली… कारण जिओचा हा आयपीओ भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय… जवळपास 30 हजार कोटी रुपयांचा हा आयपीओ असून ज्यांना जिओचे शेअर्स मिळतील त्यांच्यावर थेट पैशाचा पाऊसच पडेल, अशी चर्चा सुरू आहे…जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले एलॉन मस्क भारताच्या इंटरनेट बाजारात स्टारलिंकच्या माध्यमातून प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत…
आणि नेमक्या याच काळात मुकेश अंबानी जिओचा आयपीओ घेऊन आले आहेत… त्यामुळे अंबानींनी अचानक जिओचा आयपीओ का आणला? मस्क यांच्या स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाआधीच अंबानी मोठी आर्थिक खेळी करण्याच्या तयारीत आहेत का? आणि जिओच्या आयपीओमधून उभारले जाणारे हजारो कोटी रुपये मस्क यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी वापरले जाणार का? याची चर्चा सुरू झालीये…
Jio Platforms IPO ची महत्त्वाची माहिती ( Jio IPO 2026 )
जिओ प्लॅटफॉर्म्सने 21 ऑक्टोबरपासून आयपीओ खुला करण्याची योजना जाहीर केली आहे… या आयपीओसाठी एका शेअरची किंमत 1,065 ते 1,119 रुपये निश्चित करण्यात आली आहे… कंपनी जवळपास 27 कोटी नवीन शेअर्स बाजारात आणणार आहे… या शेअर्सच्या विक्रीतून जवळपास 30 हजार 213 कोटी रुपये उभारला जाणार आहे… याआधी ह्युंदाई मोटर इंडियाचा सुमारे 27 हजार 870 कोटी रुपयांचा आयपीओ भारतातील सर्वात मोठा आयपीओ होता… त्यामुळे जिओचा आयपीओ नियोजित आकारात पूर्ण झाला, तर तो हा विक्रम मोडू शकतो… विशेष म्हणजे या आयपीओमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सचं एकूण बाजारमूल्य जवळपास 10 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय…
मुकेश अंबानी एवढे श्रीमंत आहेत, त्यांना अचानक पैशांची गरज का पडली? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल…तर जिओ ही आधीपासूनच भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे… देशभरात जिओचे कोट्यवधी मोबाईल ग्राहक आहेत… जिओने मोबाईल इंटरनेट, फायबर ब्रॉडबँड आणि डिजिटल सेवांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे… मात्र एवढा मोठा व्यवसाय चालवण्यासाठी आणि भविष्यात आणखी विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते… जिओच्या आयपीओ कागदपत्रांनुसार उभारण्यात येणाऱ्या निधीचा मोठा भाग रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरण्याची योजना आहे… म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून अंबानी जिओच्या आर्थिक रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहेत…
हेही वाचा : Elon Musk Starlink India : एलोन मस्क भारताला हायजॅक करणार? अंबानींशी वादामागचं नेमकं कारण काय?
Elon Musk यांच्या Starlink सोबत स्पर्धा?
पण या निर्णयाची वेळही महत्त्वाची आहे… कारण एकीकडे जिओ शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे एलॉन मस्क यांची स्टारलिंक भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे… स्टारलिंक ही स्पेसएक्सची उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट पुरवणारी सेवा आहे… ज्या भागात मोबाईल टॉवर किंवा फायबर नेटवर्क पोहोचलेलं नाही, अशा दुर्गम भागात सॅटेलाइट इंटरनेटचा उपयोग होऊ शकतो… भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्याची मोठी बाजारपेठ आहे… त्यामुळे मस्क यांना भारतातील या बाजारात प्रवेश करायचा आहे… आणि याच क्षेत्रात रिलायन्स जिओचीही व्यावसायिक महत्त्वाकांक्षा आहे…
विशेष म्हणजे जिओ आणि स्टारलिंक यांच्यातील स्पर्धा ही केवळ इंटरनेटच्या दरांपुरती मर्यादित नाही… भारतात सॅटेलाइट इंटरनेटसाठी आवश्यक असलेल्या स्पेक्ट्रमच्या वाटपावरून यापूर्वी दोन्ही कंपन्यांच्या भूमिकांमध्ये मतभेद दिसून आले होते… रिलायन्सकडून स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची भूमिका मांडण्यात आली होती… तर स्टारलिंकने प्रशासकीय पद्धतीने स्पेक्ट्रम वाटप करण्याचं समर्थन केलं होतं… त्यामुळे भविष्यातील सॅटेलाइट इंटरनेट बाजारावर कोणाचं वर्चस्व निर्माण होणार, यासाठी दोन्ही कंपन्या आपापल्या व्यावसायिक धोरणांनुसार प्रयत्न करत आहेत…
हेही वाचा : Reliance Jio IPO 2026: देशातील सर्वात मोठ्या IPO ची तयारी; २१ ऑक्टोबरपासून गुंतवणुकीची संधी
Jio IPO मधून गुंतवणूकदारांना नफा मिळेल का? ( Jio IPO Price )
आता याच पार्श्वभूमीवर जिओच्या आयपीओकडे पाहिलं जातंय… कारण हजारो कोटी रुपयांचं भांडवल उभारल्यामुळे जिओला आपलं कर्ज कमी करण्यास मदत होऊ शकते… कर्जाचा बोजा कमी झाल्यास भविष्यातील नवीन तंत्रज्ञान, नेटवर्क विस्तार आणि डिजिटल सेवांसाठी कंपनीला आर्थिक लवचीकता मिळू शकते… त्यामुळे स्टारलिंकसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी जिओची आर्थिक ताकद महत्त्वाची ठरू शकते…कारण भारतात एलॉन मस्क स्टारलिंकच्या माध्यमातून आपलं साम्राज्य उभारण्याच्या तयारीत आहे…जर स्टारलिंक भारतात आलं आणि त्यावेळी JIO चा आयपीओ आला तर याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे…यामुळे अंबानी यांनी JIO च्या IPO ची घोषणा केल्याची चर्चा आहे…
अंबानींच्या या निर्णयामागे आणखी एक मोठं व्यावसायिक कारण आहे… ते म्हणजे जिओच्या व्यवसायाला शेअर बाजारात स्वतंत्र ओळख मिळवून देणं… रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तेल, पेट्रोकेमिकल्स, रिटेल, दूरसंचार आणि डिजिटल सेवा अशा अनेक व्यवसायांचा समावेश आहे… मात्र जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात स्वतंत्रपणे सूचीबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांना थेट जिओच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे… त्याचबरोबर जिओचं स्वतंत्र बाजारमूल्यही स्पष्ट होईल… त्यामुळे हा आयपीओ केवळ पैसे उभारण्यापुरता मर्यादित नसून रिलायन्स समूहाच्या डिजिटल व्यवसायाला स्वतंत्र आर्थिक स्थान मिळवून देण्याचाही प्रयत्न आहे…
आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिओचा आयपीओ मिळाल्यानंतर खरंच पैशांचा पाऊस पडणार का? जिओ ही देशातील मोठी कंपनी असल्यामुळे आयपीओला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय… मात्र आयपीओ मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांना नफा होईलच, याची कोणतीही हमी नाही… कारण शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर जिओच्या शेअरची किंमत वाढूही शकते आणि कमीही होऊ शकते…सध्या भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे…गुंतवणूकदारांना कोणताही फायदा होताना दिसत नाही..त्यामुळे गुतंवणूकदार या IPO ला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे….









