Best Sunscreen | सध्या सर्वत्र उन्हाचा (Summer) तडाखा चांगलाच जाणवताना दिसत आहे. तर या कडक उन्हामुळे बाहेर पडलं की त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते. अतिनील किरणांच्या संपर्कामुळे त्वचेत अनेक बदल होऊ शकतात, ज्यात कोरडेपणा, सुरकुत्या, टॅनिंग अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेच्या काळजीसाठी योग्य SPF पातळी असलेले सनस्क्रीन (Sunscreen) नियमितपणे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग सनस्क्रीन खरेदी करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण जाणून घेऊया.
सनस्क्रीन खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
सनस्क्रीन खरेदी करताना लोक अनेकदा SPF 15 किंवा 20 असलेले सनस्क्रीन घेतात. पण असे सनस्क्रीन उन्हाळ्यात उपयुक्त नाही. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी SPF 30 किंवा त्याहून अधिक रेटिंग असलेले सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. SPF 30 पेक्षा जास्त रेटिंग असलेले सनस्क्रीन 97% पेक्षा जास्त अतिनील (UV) किरणे रोखतात आणि आपलं त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण करतात.
स्टार रेटिंग असलेले सनस्क्रीन खरेदी करा. बूट्सचे स्टार रेटिंग तुम्हाला सनस्क्रीनद्वारे मिळणारे UVA संरक्षण मोजण्याची संधी देते. उदाहरणार्थ PA+ म्हणजे UVA किरणांपासून थोडे संरक्षण, PA++ म्हणजे मध्यम संरक्षण आणि PA+++ म्हणजे UVA किरणांपासून खूप चांगले संरक्षण. त्यामुळे हे स्टार रेटिंग बघूनच सनस्क्रीन खरेदी करा.
उन्हाळ्यात खूप घाम येतो, म्हणून असे सनस्क्रीन निवडा जे घाम किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यावर लवकर निघून जाणार नाही. सनस्क्रीन खूप चिकट किंवा घट्ट नाही याची खात्री करा. याचा अर्थ तुम्ही जेल किंवा पाण्यावर आधारित सनस्क्रीन निवडू शकता. जर जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जेल किंवा पाण्यावर आधारित सनस्क्रीन वापरावे, कारण ते तुमची त्वचा थंड ठेवण्यास मदत करते.
जर तुमची त्वचा सामान्य असेल, तर तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी लोशन आधारित सनस्क्रीन सर्वोत्तम आहे. कारण ते त्वचेला जास्त तेलकट न करता आर्द्रता देण्यास मदत करते. तसेच ज्यांची कोरडी त्वचा असते त्यांच्या त्वचेमध्ये सेबमची पातळी कमी असते. त्यामुळे तुम्ही उच्च SPF असलेले मॉइश्चरायझिंग किंवा घट्ट सनस्क्रीन वापरू शकता.











