Devendra Fadnavis | नागपुरमध्ये (Nagpur) एक मोठी दुर्घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट (Blast) झाला असून या दुर्घटनेत 17 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 18 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमी कामगारांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दु:ख व्यक्त करत या स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी मृत झालेल्या वारसांना 5 लाख रूपयांची आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे जाहीर केले आहे.
हेही वाचा – मावळात भाजप कार्यकर्त्यांने उभारला अजित पवार यांचा राज्यातील पहिला अर्धकृती पुतळा
देवेंद्र फडणवीसांनी दिले घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश
या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत म्हटलं आहे की, नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारकडून मृत वारसांना 5 लाख रूपये मदत जाहीर
तसेच स्फोटकांच्या फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल. याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत म्हटलं आहे.
दरम्यान, कंपनीत स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली होती. त्यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. तर सध्या अग्निशमन दल आणि बचाव पथकाडून घटनास्थळी मतदकार्य सुरू आहे.












