• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • “त्या व्यक्तीचा हेतू…”, प्राणघातक हल्ल्यानंतर फारूख अब्दुल्ला यांची पहिली प्रतिक्रिया
Top News

“त्या व्यक्तीचा हेतू…”, प्राणघातक हल्ल्यानंतर फारूख अब्दुल्ला यांची पहिली प्रतिक्रिया

farooq abdullah

Farooq Abdullah | जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी (11 मार्च) एक धक्कादायक घटना घडली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. एका लग्न समारंभात फारूख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करताना गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात फारूख अब्दुल्ला थोडक्यात बचावले. तर या हल्ल्यानंतर आता फारूख अब्दुल्ला यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – गॅस संकटाचा IT सेक्टरला फटका; नामांकित कंपन्यांचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना

जीवघेण्या हल्ल्यानंतर काय म्हणाले फारूख अब्दुल्ला?

त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत फारूख अब्दुल्ला म्हणाले की, जेव्हा मी कार्यक्रम झाल्यानंतर तिथून बाहेर पडत होतो तेव्हा अचानक मला फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला आणि नंतर मला ताबडतोब गाडीमध्ये बसवण्यात आले. मला गाडीत बसवण्यात आल्यानंतर सांगण्यात आले की माझ्या मागे पिस्तूल घेऊन एका व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. त्या व्यक्तीचा नेमका हेतू काय होता हे मला माहिती नाही, असं अब्दुल्ला म्हणाले.

पुढे ते म्हणाले, या हल्ल्यातून मला वाचवण्यासाठी माझ्यासोबत असलेल्या एनएसजी (NSG) आणि स्थानिक पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली होती. त्यांनी माझ्यासाठी जे काही केले त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. अल्लाहमुळे माझा जीव वाचला आणि माझी सुरक्षा देखील माझ्यासोबत होती.

हल्लेखोराचा नेमका हेतू काय होता हे मला माहिती नाही. पण यामध्ये सुरक्षेची चूक होती. कारण लग्नसोहळ्यासारख्या कार्यक्रमात मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या आणि तिथे एकही पोलीस उपस्थित नव्हता, अशी खंतही फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

फारूख अब्दुल्ला यांना अमित शाह यांनी दिले मोठे आश्वासन

तसेच गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आल्याची माहितीही फारूख अब्दुल्ला यांनी दिली. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आला होता. त्यांनी माझी विचारपूस केली. तसेच मला त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे, असंही अब्दुल्ला यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘ग्रेटर कैलास’ येथील रॉयल पार्क येथे फारूख अब्दुल्ला एका लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नसमारंभ झाल्यानंतर ते तेथून बाहेर पडत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. फारूख अब्दुल्ला यांच्या मागेच हल्लेखोर होता. त्यामुळे हल्लेखोराने त्यांच्या जवळ जात त्यांच्यावर पिस्तूल ताणली आणि गोळी झाडली. पण, तप्तरता दाखवत एनएसजी कमांडोंनी हल्लेखोराला जोरात धक्का दिला ज्यामुळे गोळीचा निशाणा चुकला. या हल्ल्यात अब्दुल्ला फारूख थोडक्यात बचावले आहेत. तर या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फारूख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोराला उपस्थित लोकांनी पकडले. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. कमल सिंग जमवाल (65 वय) असे या हल्लेखोराचे नाव असून तो मुळचा जम्मूच्या पुरानी मंडी येथील आहे. अटक केल्यानंतर “मी मागील 20 वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो”, असं आरोपीने म्हटलं आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी कमल सिंग जमवालच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts