Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • जळगावच्या हॉस्पिटलमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकाचा डॉक्टरांवर गंभीर आरोप
गुन्हा

जळगावच्या हॉस्पिटलमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकाचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

Jalgaon Hospital Suspicious Death

Jalgaon Hospital Suspicious Death : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये कथित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हॉस्पिटल यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात

जळगावच्या नशिराबाद येथील गोदावरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. स्वप्नील रोहिदास बनसोडे या तरुणावर ९ फेब्रुवारी रोजी कंबरदुखीच्या त्रासामुळे मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती अचानक खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.

प्रकृतीबाबत गुगलवर सर्च करा, असं डॉक्टरांकडून उर्मट उत्तर

मृत तरुणाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत सांगितलं की, कोणतीही आवश्यक तपासणी जसे की, एक्स रे किंवा एमआरआय न करता थेट शस्त्रक्रिया करण्यात आली. एवढेच नव्हे, तर रुग्णाची प्रकृती विचारल्यावर डॉक्टरांकडून “गुगलवर सर्च करा” असं उर्मट उत्तर देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

रुग्णाची वैद्यकीय फाईल देण्यास टाळाटाळ

याशिवाय, रुग्णाची वैद्यकीय फाईल देण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर काही वेळातच मृत्यू घोषित करण्यात आल्याने उपचारांबाबत संशय अधिकच गडद झालाय.

नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी तपास सुरू केला आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, रुग्णालयाचे सर्व रेकॉर्ड्स ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई – पोलीस

वैद्यकीय समितीचा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्याची मागणी

दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तातडीने दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात असून, पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts