• Home
  • ताज्या बातम्या
  • एम डी. प्रवेशाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हेगार जाळ्यात
Top News

एम डी. प्रवेशाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हेगार जाळ्यात

MD Admission Fraud Case

MD Admission Fraud Case : वैद्यकीय शिक्षणासाठी एम.डी. ला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एका डॉक्टराची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय सराईत गुन्हेगाराला बीडच्या केज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमध्ये एकूण १५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

धारूर येथील फिर्यादी डॉ. अविनाश रामचंद्र तोंडे (वय २७) यांची आरोपी सौरभ कुलकर्णी याच्याशी फेसबुकवरील ‘एस. के. इज्युकेशन संस्था’ या पेजवरून ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, वर्धा येथे मॅनेजमेंट कोट्यातून एम.डी. साठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. ६५ लाख रुपयांत प्रवेश निश्चित करण्याचे ठरवून आरोपीने २० ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान डॉ. तोंडे यांच्याकडून ८ लाख रुपये उकळले. मात्र, प्रवेश न मिळाल्याने आणि पैसे परत देण्यास नकार दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. तोंडे यांनी धारूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा – राज्य मंडळाची मोठी करावाई! राज्यातील दहावीची ३१ तर बारावीची ७६ परीक्षा केंद्राची मान्यता रद्द

कराड येथून आरोपीला शिताफीने ताब्यात

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी स्वतः या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा लागला. केज उपविभागीय कार्यालयाचे एक विशेष पथक सातारा जिल्ह्यात रवाना झाले होते. अखेर कराड येथून आरोपी सौरभ कुलकर्णी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

१५ गुन्हे आणि ३.८६ कोटींची फसवणूक

पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीचे मोठे कारनामे उघडकीस आले आहेत. त्याच्यावर नाशिक, सोलापूर, जालना, नागपूर, पुणे, मुंबई, सांगली यांसह पंजाबमधील अमृतसर आणि गुजरातमध्येही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने आतापर्यंत विविध ठिकाणी सुमारे ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

टोळीपासून सावध राहण्याचे पोलिसांची आवाहन

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम (IPS) यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अशा प्रकारे सोशल मीडियावरून किंवा मध्यस्थांमार्फत मेडिकल प्रवेशाचे आमिष दाखवणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts