petrol diesel shortage chaos : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांगरा येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांची गर्दी झाली होती. इंधन मिळवण्यासाठी झालेल्या चढाओढीत वाद वाढून परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एका व्यक्तीला 8 ते 10 जणांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
वाशिममध्ये सलग तिसऱ्या दिवशी डिझेल तुटवडा
वाशिममध्ये सलग तिसऱ्या दिवशी डिझेल तुटवडा कायम आहे. अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लावण्यात आले आहेत. सकाळपासूनच कॅन घेऊन पंपांवर रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. परभणी जिल्ह्यातही इंधन तुटवड्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉक फलक झळकत असल्याने वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. इंधन उपलब्ध नसल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असून ग्रामीण भागातही वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी वाहनधारकांनी तासन्तास रांगा लावूनही इंधन मिळाले नसल्याची माहिती आहे.
हिंगोली जिल्ह्यात 35 पैकी 25 पेट्रोल पंपांवर डिझेल तुटवडा
हिंगोली जिल्ह्यात 35 पैकी 25 पेट्रोल पंपांवर डिझेल तुटवडा निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येतीय. इंधन मिळत नसल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे. राज्यात इंधन तुटवडा, दरवाढ आणि पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. काही ठिकाणी हिंसक घटना, काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन तर काही ठिकाणी प्रशासनावर दबाव वाढताना दिसत आहे.
पुण्यात इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक
पुण्यात इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक झाली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू करत आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केले असून पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. तरीही मनसे आंदोलनावर ठाम आहे.
डिझेल दरवाढीमुळे शेती मशागतीचा खर्च वाढला
एकुणच महाराष्ट्रात डिझेल दरवाढीमुळे शेती मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी चिंतेत असून आम्ही जगायचं कसं? असा सवाल करत आहेत. ट्रॅक्टरसाठी इंधन मिळत नसल्याने खरीपपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. शेतीची मशागतीची कामे खोळंबली असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरीपपूर्व मशागतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असताना ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणांसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
नागरिक, शेतकरी आणि वाहनधारक मोठ्या अडचणीत
अनेक ठिकाणी कॅन घेऊन शेतकरी पंपांवर थांबलेले दिसत आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. एकंदरीत इंधन तुटवडा आणि दरवाढीमुळे राज्यभरात नागरिक, शेतकरी आणि वाहनधारक मोठ्या अडचणीत सापडले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.










