Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ड्रग्ज, गुंडगिरीने पुणेकर त्रस्त, पोलीस साहेबांच्या स्वागतात व्यस्त 
Pune

ड्रग्ज, गुंडगिरीने पुणेकर त्रस्त, पोलीस साहेबांच्या स्वागतात व्यस्त 

Pune Police Commissioner
Pune Gangsterism : पुण्यात सध्या काय चाललंय? चौकाचौकात कोयता गँगची दहशत आहे… पबमध्ये ड्रग्जचे ढीग सापडतायत… ट्रॅफिक कोंडीने पुणेकरांचा जीव मेटाकुटीला आलाय… पण, पुणे पोलिसांना याची काहीही पडलेलं नाही! त्यांना चिंता आहे ती फक्त आपल्या ‘साहेबांच्या’ स्वागताची! होय… पुणे पोलीस आयुक्तांच्या स्वागतासाठी पुण्यात चक्क ‘रेड कार्पेट’ अंथरण्यात आलंय. निमित्त होतं केवळ एका वार्षिक तपासणीचं… पण थाट मात्र एखाद्या महाराजांसारखा! साहेबांसाठी ट्रॅफिक थांबवली, ड्रोन उडवले आणि रेड कार्पेट टाकले गेले. पुणेकरांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले असताना पोलिसांचा हा ‘व्हीआयपी’ इव्हेंट कशासाठी? असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडलाय…  त्यामुळे पुणेकर गुन्हेगारीमुळे त्रस्त असताना, पोलिस मात्र साहेबांची मर्जी राखण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार वार्षिक तपासणीसाठी येणार, म्हणून उपआयुक्त कृषिकेश रावले यांच्या कार्यालयाने जणू इव्हेंट मॅनेजमेंटचंच कंत्राट घेतलं होतं. साहेब येणार म्हणून चक्क लाल कार्पेट अंथरला गेला. नुसतं रेड कार्पेट नाही, तर साहेबांच्या या शाही एंट्रीचं शूटिंग करण्यासाठी आकाशात चक्क ड्रोन घिरट्या घालत होते! हे चित्र प्रत्यक्ष पाहणाऱ्याला आपण साऊथचा एखादा चित्रपत्र तर पाहात नाहीत ना? असा भास नक्कीच झाला असावा.

ड्रोनचा आणि रेड कार्पेटचा ‘तामझाम’ कशासाठी?

बरं एवढ्यावरच हे थांबले नाहीत! अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि उपआयुक्त कृषिकेश रावले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीसाठी, सर्वसामान्यांची वाहतूक काही काळ वेठीस धरण्यात आली. रस्ते अडवले गेले. प्रोटोकॉलनुसार सलामी देणं समजू शकतो, पण हा ड्रोनचा आणि रेड कार्पेटचा ‘तामझाम’ कशासाठी? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढतोय

आज पुणे शहरात बांगलादेशी घुसखोर बिनधास्त वास्तव्य करत आहेत. ड्रग्ज तस्करांनी पुण्याचे लचके तोडायला सुरुवात केलीय. कायता गँगसह अनेक गुन्हेगारी टोळ्या फोफावत आहेत.  पुण्याच्या गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढतोय. कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा झाली की नाही देव जाणे! पण स्वागताच्या या भपकेबाजीने पोलिसांच्या प्राधान्यक्रमावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

पोलीस अधिकारी साहेबांची मर्जी राखण्यात व्यस्त

पोलीस आयुक्त शहराचा आढावा घेण्यासाठी आले होते की स्वतःचा सत्कार करून घेण्यासाठी, हाच खरा प्रश्न आहे. जर पोलीस अधिकारीच एकमेकांची मर्जी राखण्यात आणि स्वागताचे इव्हेंट करण्यात मग्न असतील, तर सर्वसामान्य पुणेकरांनी सुरक्षेची भीक कुणाकडे मागायची? गुन्हेगारांवर वचक बसवण्याऐवजी, रेड कार्पेटवर चालण्यात धन्यता मानणाऱ्या या व्यवस्थेला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts