Supriya Sule Family Political Link : खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेच्या (Revati Sule) लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रेवतीचं लग्न नागपूरचे उद्योजक अरुण लखानी (Arun Lakhani) यांचे चिरंजीव सारंग लखानी सोबत होणार आहे. हा विवाह सोहळा 20 जून रोजी (Wedding Ceremony on June 20th) मुंबई संपन्न होणार असल्याची माहिती आहे. मात्र या लग्नाची चर्चा सुरु असतानाच खासदार सुप्रिया सुळेंचे (MP Supriya Sule) व्याही अरुण लखानी भाजपकडून आमदार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पवार कुटुंब आणि भाजप जवळ येण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील रखडलेल्या १७ विधान परिषद जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सध्या जागावाटप आणि उमेदवारांच्या निवडीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या राजकीय धामधुमीत विदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे वरिष्ठ नेते आणि उद्योजक अरुण लाखानी यांचे नाव पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीत चाललंय काय? इद्रीस नायकवाडींना राजीनाम्याची मागणी
प्रदेश कार्यकारिणीत अरुण लाखानी यांच्यावर मोठी जबाबदारी
लखानी भाजपकडून मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. लखानी निवडणुकीच्या मैदानात उतरणार या पेक्षा जास्त चर्चा खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी आमदार होणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि अरुण लाखानी यांचे सुपुत्र सारंग लाखानी यांचा विवाह निश्चित झाला आहे. राज्यात कौटुंबिक आघाड्या आणि राजकीय तटबंदी वेगवेगळ्या असल्याच्या अनेक चर्चा सुरू असतानाच, भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन प्रदेश कार्यकारिणीत अरुण लाखानी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
गेल्या निवडणुकीतही अरुण लाखानी यांच्या नावाची जोरदार चर्चा
अरुण लाखानी यांची भाजपच्या ‘सह-कोषाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण लाखानी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. गेल्या निवडणुकीतही या मतदारसंघातून अरुण लाखानी यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. यावेळी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजताच त्यांचे नाव पुन्हा आघाडीवर आले आहे. अरुण लाखानी हे ‘विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (VIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी नागपूरमधील प्रसिद्ध २४४७ जलवितरण प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसारख्या विदर्भातील मोठ्या विकास प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे.
तसेच ‘लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट’च्या माध्यमातून ते गडचिरोली आणि विदर्भातील दुर्गम आदिवासी भागांत ५०० हून अधिक एकल शिक्षक शाळा चालवतात. सोबतच, ‘रुणाधार ट्रस्ट’च्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या कौशल्य विकासासाठी मोठे काम केले आहे. या सामाजिक कार्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचा थेट संपर्क आहे. तसेच महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे (MBA) अध्यक्ष म्हणूनही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
अरुण लाखानी यांच्यासारख्या वजनदार चेहऱ्याला संधी
वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या जागेवर अरुण लाखानी यांच्यासारख्या वजनदार चेहऱ्याला संधी देऊन भाजप आपली पकड अधिक मजबूत करण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. कौटुंबिक सोयरिक आणि त्यानंतर लगेचच भाजपच्या मुख्य प्रदेश कार्यकारिणीत मिळालेले स्थान यामुळे विदर्भातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
ही निडवणूक 100 कोटींची होणार
मात्र यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. अरुण लखानी असू देत किंवा कुठल्या दुसरे उद्योगपती असू देत, शेवटी ते उद्योगपतीच आहेत. ही निडवणूक 100 कोटींची होणार आहे. आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेरच्या आहेत. किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या आमच्या आवाक्याच्या बाहेरच्या दिसत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. यावर आता भाजप काय प्रत्युत्तर देणार आणि पवार कुटुंबाकडून किंवा सुप्रिया सुळेंकडून काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












