Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • शिस्तभंग! घड्याळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उल्हासनगर मनपा आयुक्तांचा दणका; तासभर बाहेरच रोखले
Top News

शिस्तभंग! घड्याळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उल्हासनगर मनपा आयुक्तांचा दणका; तासभर बाहेरच रोखले

Ulhasnagar Municipal Discipline Action

Ulhasnagar Municipal Discipline Action : घड्याळाकडे पाठ फिरवणाऱ्यांना आज सकाळी थेट प्रशासनाचा दणका बसला. उल्हासनगर महापालिकेतील लेटलतीफपणाला लगाम घालण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आज सकाळी धडक कारवाई करत वेळेवर या, नाहीतर बाहेरच थांबा असा स्पष्ट संदेश दिला. उशिरा कार्यालयात येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तब्बल एक तास महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखण्यात आले. या कठोर भूमिकेमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून, शिस्तभंगाला यापुढे कोणतीही माफी नाही, हे ठामपणे अधोरेखित झाले आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या कामकाजात शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकाभिमुख सेवा या त्रिसूत्रीवर भर देत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सोमवारी सकाळी लेटलतीफ अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली. ठरलेल्या वेळेनंतर कार्यालयात दाखल होणाऱ्यांना महापालिका मुख्यालयात थेट प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी सुमारे एक तास महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर ३० ते ४० अधिकारी व कर्मचारी थांबून राहिले.

हेही वाचा – अजितदादांच्या विमान अपघातादिवशी नेमकं काय घडलं? रोहित पवारांनी प्रत्येक मिनिटांची माहिती दिली

कारवाईमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण

अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आयुक्तांनी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवत कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत समज दिली. महापालिकेचे प्रत्येक काम नागरिकांशी निगडित आहे. नागरिक कार्यालयीन वेळेत कार्यालयात येतात, तसाच वेळेवर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हजर राहणे अपेक्षित आहे. शिस्त ही ऐच्छिक नसून बंधनकारक आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

समज न देता कडक प्रशासकीय कारवाईचा इशारा

पुन्हा असा कामातील हलगर्जीपणा किंवा शिस्तभंग आढळल्यास केवळ समज न देता कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी आयुक्तांनी दिला. या कारवाईचा उद्देश दंडात्मक नसून महापालिकेचे कामकाज अधिक कार्यक्षम, वेळेत आणि परिणामकारक करणे हाच असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली

आयुक्तांच्या या ठोस आणि निर्भीड भूमिकेमुळे महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे कामकाजात शिस्त येईल आणि नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘वेळेची शिस्त म्हणजेच प्रशासनाची विश्वासार्हता’ हा संदेश या कारवाईतून स्पष्टपणे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts