Rajyasabha Election 2026 | सध्या राजकीय वर्तुळात सर्व पक्षांचं लक्ष लागलं आहे ते आगामी राज्यसभा निवडणुकांकडे (Rajyasabha Election). तर या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळत आहे. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीमधून एकच जागा जाणार आहे, त्यामुळे आता ही एक जागा कोणत्या पक्षाला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा – ‘सुनेत्रा पर्व’ सुरू, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार विराजमान
राज्यसभेसाठी ठाकरे गटातील कोणते नेते इच्छुक?
राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. या उमेदवारीसाठी ठाकरे गटातील अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, विनायक राऊत आणि प्रियांका चर्तुर्वेदी हे नेते इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. एकिकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे आता ठाकरे गटामध्ये राज्यसभेच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू झाल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.
शरद पवारांना उमेदवारी मिळणार?
राज्यसभेसाठी आपला उमेदवार जावा म्हणून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. या जागेसाठी ठाकरे गटातील काही नेते इच्छुक असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शरद पवारांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान, राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इच्छुक असल्याने आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच आता हा पेच सोडवण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.












