Siren Ring on Phone : देशभरातील लाखो लोकांना आज सकाळच्या सुमारास त्यांच्या मोबाईल फोनवर अचानक सायरनसारखा मोठा आवाज ऐकू आला, ज्यामुळं नागरिकांमध्ये घबराट पसरली. जर तुम्हालाही तुमच्या मोबाईल फोनवर सायरनचा आवाज ऐकू आला असेल, तर घाबरण्याची गरज नाही. हे कोणत्याही आपत्तीचं चिन्ह नसून, सरकारच्या एका चाचणीचा भाग आहे.
हेही वाचा : 4 मे नंतर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ होणार? केंद्रीय
सुचना प्रणालीचा भाग :
भारत सरकारच्या दूरसंचार विभागानं (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (NDMA) संयुक्तपणे एका नवीन मोबाईल-आधारित आपत्ती सूचना प्रणालीची चाचणी केली आहे. भूकंप, पूर किंवा चक्रीवादळ यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांना त्वरित सतर्क करणं, हे या प्रणालीचं उद्दिष्ट आहे. या प्रणालीला ‘सचेत’ (राष्ट्रीय आपत्ती सूचना पोर्टल) असं म्हटलं जातं. यापूर्वी दिल्ली-एनसीआर आणि इतर प्रमुख शहरांमध्ये याची चाचणी घेण्यात आली आहे.
सायरन दरम्यान आलेल्या संदेशात काय म्हटलं :
सायरन वाजल्यावर आलेल्या संदेशात असं लिहिलं आहे, “भारतानं स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन एक सेल ब्रॉडकास्ट सेवा सुरु केली आहे, जी नागरिकांना आपत्तीची तात्काळ माहिती देईल. सतर्क नागरिक, एक सुरक्षित राष्ट्र.” हा संदेश मिळाल्यावर जनतेला कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. हा एक चाचणी संदेश आहे- भारत सरकार.
सूचना प्रणाली नेमकी काय आहे? :
तुमच्या मोबाईल फोनवर आलेली सूचना ही आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने शिफारस केलेल्या कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (CAP) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रणालीमध्ये, आपत्तीच्या वेळी मोठे अलार्म किंवा सायरनच्या आवाजासह मोबाईल फोनवर त्वरित एक संदेश पाठवला जातो. ही सूचना केवळ धोका असलेल्या भागातील लोकांनाच पाठवली जाते. सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करुन, हा संदेश एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचतो.
या प्रणालीची गरज काय आहे? :
अशा सूचना प्रणालीचा उद्देश कोणत्याही आपत्तीपूर्वी लोकांना सावध करणे हा आहे, जेणेकरुन ते सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतील. भारत सरकारचा असा विश्वास आहे की, योग्य वेळी अचूक माहिती मिळाल्यास अनेक मोठ्या आपत्तींचा प्रभाव कमी करता येतो.






