young man suicide : कोल्हापुरात ज्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला गमावलं, त्याच ठिकाणी एका व्यक्तीने आपले जीवन संपवले आहे. विराट गौतम असं मृताचं नाव आहे. पत्नी आणि मुलांच्या मृत्यूने उद्ध्वस्त झालेल्या विराट यांनी अडीच वर्षे दुःखाशी झुंज दिली. मात्र त्याच काळ्या ठिकाणी येऊन आत्महत्या केल्याने कोल्हापूरसह पुण्यातही हळहळ व्यक्त होत आहे.
२३ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्याहून मुंबईकडे निघालेली खासगी बस राधानगरी रोडवरील पिरवाडी (पुईखडी) जवळील धोकादायक वळणावर मध्यरात्री उलटली आणि या भीषण अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील विराट गौतम यांच्या आयुष्याचा आधारच हिरावला गेला. पत्नी नीलू गौतम, मुलगी रिद्धिमा आणि मुलगा सार्थक यांचा जागीच मृत्यू झाला, तर विराट स्वतः जखमी अवस्थेत बचावले. अपघातावेळी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी केलेला आटोकाट प्रयत्नही निष्फळ ठरला आणि ही असह्य वेदना त्यांच्या मनात कायमची कोरली गेली.
या दुर्घटनेनंतर विराट यांनी एकट्याने आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला; मात्र पत्नी आणि मुलांच्या आठवणींनी त्यांना सतत पोखरत ठेवले. सोशल मीडियावरील त्यांच्या भावनिक पोस्टमधून त्यांची मानसिक घालमेल वारंवार दिसून येत होती. “माझे जग त्याच दिवशी संपले”, “कसे जगतोय हेच कळत नाही” अशा शब्दांत त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.
२०२४ आणि २०२५ मध्येही विराट गौतम अपघातस्थळी येऊन कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहत होते. यंदाही ते काही दिवस आधी कोल्हापुरात आले होते. मात्र, आठवणींचा असह्य भार सहन न झाल्याने त्यांनी त्याच ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी स्थानिकांना त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.










