Undercooked Mutton Dispute Case : एकीकडे पाहुणचाराचा थाट दुसरीकडे संशयाचे काळेकुट्ट जाळे.. या विसंगतीत एका निष्पाप गृहिणीचा बळी गेला आहे. केवळ मटण नीट शिजले नाही या कारणावरून झालेल्या वादाने आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका हसत्या खेळत्या संसाराची राखरांगोळी झाली. मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन न होवून पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. चेतना मनोज जाधव असे मृत पत्नीचे नाव आहे.
हेही वाचा – नवं घर उभं राहत असताना काळाचा घाला; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
चेतनाचा पती मनोज जाधव याने त्याच्या एका मित्राला घरी जेवणासाठी घरी बोलावले होते मटणाची भाजी चांगली कर अशी सुचना त्याने पत्नीला दिली होती. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता पण पाहुण्यासमोरच मनोजचा पारा चढला होता. मटण व्यवस्थित शिजले नाल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरवात केली हा वाद केवळ स्वयंपाकापूरता अमर्यादित राहिला नाही,तर मनोज च्या जुन्या संशयित स्वभावाचा आणि व्यसनाचा तडका लागला.
कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला
मिळालेल्या माहितीनुसार मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापुर्वी 2015 मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. 2017 मध्ये पुन्हा सुखाने संसार करू या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. मात्र बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला इतका खोल लागला की, तिने टोकाचे पाऊल उचलले. भरल्या ताटावरून ती आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन जेव्हा तिने ही बाब पतीला सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली. तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण नियतीला काही वेगळे मान्य होते डॉक्टरांनी तिला तपासले आणि मृत घोषित केले.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद
चेतना चे मामा मनोहर राठोड, राहणार देवगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. चेतनाच्या मृत्यू नंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेली गर्दी आणि त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता. आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले असून पोलीस उपनिरीक्षक नीनगूरकर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.











