• Home
  • गुन्हा
  • ड्रायव्हरसोबत प्रेमसंबंध; २० लाखांच्या विम्यासाठी पत्नीने बेडवर विषारी मण्यार साप सोडून पतीची हत्या?
गुन्हा

ड्रायव्हरसोबत प्रेमसंबंध; २० लाखांच्या विम्यासाठी पत्नीने बेडवर विषारी मण्यार साप सोडून पतीची हत्या?

Meerut Murder Case

Meerut Murder Case : मेरठ… पुन्हा एकदा थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाने देशाला हादरवून सोडलंय. मुस्कान रस्तोगी प्रकरणाची चर्चा अजून थांबलेली नसतानाच आणखी एक धक्कादायक हत्याकांड समोर आलं. एका संस्थाचालकाच्या पत्नीचे ड्रायव्हरसोबत लफडं जुळलं… आणि त्यानंतर पती त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा ठरला. त्या अडथळ्याला कायमचं दूर करण्यासाठी सुरू झाला मृत्यूचा खेळ. कधी विष देण्याचा प्रयत्न, कधी गाडीखाली चिरडण्याचा कट…. पण प्रत्येक डाव अपयशी ठरला. अखेर एका मध्यरात्री असा प्लॅन आखला गेला, ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल. बेडवर विषारी मण्यार साप सोडण्यात आला … आणि त्यानंतर जे घडलं, त्याने तपास यंत्रणांनाही हादरवून सोडलं. हा संपूर्ण कट नेमका कसा रचला गेला? अनेक महिन्यांपासून कोणकोणते प्रयत्न करण्यात आले? त्या रात्री नेमकं काय घडलं? संशयाची सुई आरोपींपर्यंत कशी पोहोचली? आणि पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा कसा केला? या हत्याकांडामागचं संपूर्ण सत्य, तपासातील धक्कादायक खुलासे पाहणार आहोत.

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर परिसरात धक्कादायक आणि क्रूर हत्याकांड घडवून आणलं….. हस्तिनापूर याठिकाणी एका खासगी शाळेचे संचालक असलेल्या ३२ वर्षीय अतुल पवार यांची अत्यंत पद्धतशीरपणे, थंड डोक्याने नियोजन करून त्यांच्या पत्नीनेच क्रूर हत्या केली. एका विषारी जिवंत सापाचा हत्यार म्हणून वापर करून हे हत्याकांड घडवून आणण्यात आलं.

हेही वाचा : देशभरात काय घडलं? आजच्या टॉप बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

मेरठमध्ये घडलेल्या थरारक हत्याकांडाने देश हादरला; पत्नी, प्रियकर आणि दोन सपेरे अटकेत :

या भयानक कथेची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला काही वर्षे मागं जावं लागेल… मृत अतुल पवार हे मेरठ जिल्ह्यातील बहसुमा भागातील भंडोरा गावचे रहिवासी होते. त्यांनी हस्तिनापूर याठिकाणी कृष्णा किड्स पब्लिक स्कूल नावाची इंग्रजी माध्यमाची पाचवी पर्यंतची प्राथमिक शाळा सुरू केली . शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांची ओळख दामिनी नावाच्या तरुणीशी झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१९ मध्ये दोघांनी प्रेमविवाह केला.

Meerut Murder Case : लग्नानंतर हे जोडपं हस्तिनापूर याठिकाणी एका भाड्याच्या घरात राहू लागलं आणि दोघां मिळून शाळेचा गाडा हाकू लागले. शाळेचे कामकाज वाढल्यामुळे मुलांची ने आण करण्यासाठी अतुल यांनी एका वॅनची व्यवस्था केली. या वॅनवर ड्रायव्हर म्हणून त्यांनी तुषार ऊर्फ निक्की नावाच्या स्थानिक तरुणाला कामावर ठेवलं. तुषारचे शाळेत आणि अतुल यांच्या घरी सतत येनं जानं सुरू झालं. याच काळात दामिनी आणि ड्रायव्हर तुषार यांच्यात जवळीक वाढली.

दोघांचं लफडं जमलं… त्यांच्या लफड्याच्या आड दामीनीचा पती अतुल पवार येत असल्याच त्यांना जाणवू लागल. पण अतुल यांना यांचं प्रेमसंबंधाबद्दल काहीच माहिती नव्हत… त्यातच अतुल यांच्या शाळेची प्रगती होत होती आणि अतुल यांनी वीस लाख रुपयांची एक मोठी जीवनविमा पॉलिसी काढली होती. जेव्हा दामिनीला या विमा पॉलिसीबद्दल समजल, तेव्हा तिच्या डोक्यात एक भयानक विचार आला. जर अतुल याचा मृत्यू झाला, तर तुषार आणि तिच्या मार्गातील मोठा काटा दूर होईल आणि विम्याचे वीस लाख रुपये सुद्धा हातात पडतील.

ड्रायव्हरसोबत प्रेमसंबंधातून रचला पतीच्या हत्येचा कट :

मग दामिनी आणि तुषार यांनी मिळून असा हा दुहेरी फायद्याचा कट रचायला सुरुवात केली. आणि दोघांचे प्लान सुरु झाले, अतुल पवारला कसा संपवायचा ( Meerut Murder Case )…. गेल्या चार महिन्यांपासून अतुलच्या मर्डरचे प्रयत्न केले जात होते. दामिनी आणि तुषार यांनी अतुलला मारण्यासाठी तीन वेळा मोठे प्रयत्न केले, पण त्यांचे दोन प्रयत्न अपयशी ठरले. चार महिन्यांपूर्वी तुषारने विषारी औषध दामिनीकडे दिलं. दामिनीने अतुल यांच्या जेवणात ते विष मिसळलं. जेवण जेवल्यानंतर अतुल यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या आणि पोट दुखू लागलं, परिस्थिती गंभीर झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांनी केलेल्या तातडीच्या उपचारांमुळे अतुल यांचा जीव थोडक्यात वाचला.

Snake Murder Case : हा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी काही दिवसांनंतर दुसरा प्लॅन तयार केला, अतुलचा ACCIDENT करायचा आणि त्याला संपवायचा… अतुल जेव्हा आपल्या मोटारसायकलवरून चालले होते, तेव्हा तुषारने आपल्या एर्टिगा कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. पण त्यांनी हेल्मेट घातलं होतं. हेल्मेटमुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली नाही. किरकोळ दुखापती झाल्या, पण त्यांचा जीव पुन्हा एकदा वाचला. या अपघातानंतर जेव्हा अतुल यांनी पोलिसात जाऊन अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा दामिनीने चलाखीने त्यांना रोखले. तिने हा अपघात पोलिसांपर्यंत पोहोचू दिला नाही आणि तुषारला सुरक्षित ठेवलं.

लागोपाठ दोन प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे तिला समजलं होतां की विषप्रयोग किंवा अपघातासारख्या पद्धती वापरल्यावर पोलिसांना संशय येऊ शकतो. त्यामुळे तिने इंटरनेटवर जुन्या गुन्हेगारी प्रकरणांच्या बातम्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशातच यापूर्वी घडलेल्या काही गुन्ह्यांचा अभ्यास करताना तिला समजलं की, जर मृत्यू सर्पदंशामुळे झाला, तर पोलीस याला नैसर्गिक अपघात मानतात आणि त्यात कोणताही फौजदारी तपास सहसा केला जात नाही. हाच विचार करून दामिनीने पुढचा तिसरा प्लान आखला … तुषारने मेरठ परिसरातील सोनू आणि उदय कुमार नावाच्या दोन गारुड्यांना संपर्कात ठेवलं…

पहिले विष देण्याचा प्रयत्न, नंतर अपघाताचा कट :

सापाची व्यवस्था करण्यासाठी दामिनीने घरून पंधरा हजार रुपयांची रक्कम तुषारला दिली, जी त्याने गारुड्यांना ॲडव्हान्स म्हणून दिली. अतुल यांच्या मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनीकडून जी वीस लाख रुपयांची रक्कम मिळणार होती, त्यातून पाच लाख रुपये या दोन्ही सपेऱ्यांना देण्याचे आमिष दामिनी आणि तुषारने त्यांना दाखवलं. पैशांच्या हव्यासापोटी सोनू आणि उदय या गुन्ह्यात सामील झाले. त्यांनी विषारी आणि घातक असा मण्यार जातीचा साप पकडला. सापाला सलग तीन दिवस एका प्लास्टिकच्या डब्यात उपाशी आणि अंधारात बंद करून ठेवण्यात आलं . तीन दिवस उपाशी असल्यामुळे तो साप आक्रमक आणि चिडचिडा झाला होता.

ठरलेल्या प्लॅननुसार, हत्येचा दिवस म्हणून गुरुवारची रात्र निवडण्यात आली. रात्रीच्या जेवणानंतर दामिनीने अतुल यांच्यासाठी दुधाचा ग्लास तयार केला. या दुधात तिने आधीच आणून ठेवलेल्या तब्बल पंचवीस झोपेच्या गोळ्या बारीक करून विरघळवून टाकल्या. दूध प्यायल्यानंतर काहीच मिनिटांत झोपेच्या गोळ्यांचा असर अतुल यांच्या शरीरावर सुरू झाला आणि ते बेडवर पूर्णपणे पडले. त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. पती पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच दामिनीनं मध्यरात्रीनंतर प्रियकर तुषारला फोन करून घरात बोलावून घेतलं.

बेडवर विषारी मण्यार साप सोडून हत्या;

शुक्रवारी पहाटेचे चार वाजले होते, संपूर्ण हस्तिनापूर परिसर गाढ झोपेत होता. तुषार एका प्लास्टिकच्या पिशवीत त्या तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या मण्यार सापाला घेऊन अतुल यांच्या बेडरुममध्ये शिरला. त्या सापाला अतुल यांनी अंगावर घेतलेल्या चादरीच्या आत शरीराजवळ बेडवर सोडले. तीन दिवसांपासून भुकेलेला बिथरलेला त्या सापाने अतुल यांच्या हातावर आणि पायावर एकामागून एक असे अनेक दंश केले. झोपेच्या गोळ्यांच्या अतिप्रमाणामुळे अतुल यांना त्या सापाच्या दंशाच्या वेदना देखील जाणवल्या नाहीत. ते कोणतीही हालचाल न करता किंवा आरडाओरडा न करता बेडवर तसेच पडून राहिले. आणि अतुल पवार यांचा जागीच अंत झाला.

Meerut Murder Case : सकाळी दामिनीने घरातून जोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिने सर्वांना सांगितलं की, बेडवर एक मोठा साप बसला आहे आणि तिचे पती अतुल हे उठत नाहीत, ते बेशुद्ध पडले आहेत. लोकांनी खोलीत पाहिले तर बेडच्या कोपऱ्यात तो विषारी मण्यार साप बसलेला होता आणि अतुल बेडवर निपचित पडले होते. लोकांनी लाठ्या काठ्यांच्या साहाय्याने त्या सापाला तिथंच मारून टाकलं.

शेजाऱ्यांच्या मदतीने अतुल यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी अतुल यांना मृत घोषित केले आणि त्यांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. सुरुवातीला सर्व काही दामिनी आणि तुषार यांच्या प्लॅननुसारच घडत होतं. संपूर्ण हस्तिनापूर आणि अतुल यांच्या नातेवाईकांमध्ये हा दुर्दैवी अपघात असल्याचीच चर्चा होती की एका विषारी सापाने घरात घुसून अतुल यांचा जीव घेतला. दामिनी पतीच्या निधनाचा प्रचंड शोक करत असल्याचा आव आणत होती, जेणेकरून कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये. परंतु, म्हणतात ना की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो तपासासाठी एखादा पुरावा किंवा चूक मागे सोडतोच. अतुल यांच्या मृत्यूची बातमी हस्तिनापूर पोलिसांपर्यंत पोहोचली ( Atul Pawar Murder ). पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टम साठी पाठवला. प्राथमिक पाहणीत पोलिसांना हा सर्पदंशाचाच प्रकार वाटत होता, परंतु पोलिसांनी तांत्रिक आणि सायबर तपास सुरू केला.

मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि सापाचे फोटो; डिजिटल पुराव्यामुळे उघडकीस :

पोलिसांनी सर्वात आधी मृत अतुल पवार ( Atul Pawar Murder ) आणि त्यांची पत्नी दामिनी यांच्या मोबाईल फोनचे CDR काढले. जेव्हा पोलिसांनी दामिनीच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा त्यांना एक अत्यंत संशयास्पद पॅटर्न पाहायला मिळाला. दामिनीच्या फोनवरून त्यांच्याच शाळेतील वॅन ड्रायव्हर तुषार ऊर्फ निक्की याला दिवसातून अनेक वेळा फोन केले गेले होते, ज्या गुरुवारी रात्री अतुल यांची हत्या झाली, त्या संपूर्ण रात्री दामिनी आणि तुषार यांच्यात अनेक वेळा फोनवर बोलणं झाले होते आणि पहाटेच्या सुमारास दोघांचे मोबाईल लोकेशन एकाच घरात म्हणजेच अतुल यांच्या राहत्या घरी दाखवत होते. एका ड्रायव्हरसोबत मालकाच्या पत्नीचे रात्रीच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोलणे आणि एकाच ठिकाणी लोकेशन असणे, यावरून पोलिसांचा संशय वाढला….

पत्नी, प्रियकर आणि दोन सपेऱ्यांना अटक

या संशयाच्या आधारे मेरठ पोलिसांनी ड्रायव्हर तुषार याला ताब्यात घेतले सुरुवातीला तुषारने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपण निष्पाप असल्याचे आणि आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. परंतु, जेव्हा सायबर सेलच्या पोलिसांनी तुषारचा मोबाईल फोन जप्त करून त्याचा डेटा रिकव्हर केला आणि गॅलरी तपासली, तेव्हा पोलिसांच्या हाती या प्रकरणाचा सर्वात मोठा पुरावा लागला. तुषारच्या मोबाईल फोनमध्ये एका प्लास्टिकच्या डब्यात बंद करून ठेवलेल्या त्याच विषारी मण्यार सापाचा फोटो आणि काही व्हिडिओ क्लिप्स पोलिसांना सापडल्या. या डिजिटल पुराव्यामुळे तुषार पूर्णपणे कोलमडला आणि पोलिसांच्या चौकशीसमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने दामिनीसोबत असलेले आपले अनैतिक संबंध, वीस लाखांच्या विम्याचा कट आणि सपेऱ्यांच्या मदतीने सापाद्वारे अतुलची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Snake Murder Case : तुषारने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृत अतुल यांची पत्नी दामिनी हिलाही ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी दामिनीला तुषारची कबुली आणि त्याच्या फोनमधील सापाचे फोटो दाखवले, तेव्हा तिचे अवसान गळाले आणि तिनेही रडत रडत आपला गुन्हा मान्य केला. दामिनीने पोलिसांना सांगितले की, तिला तुषारसोबत लग्न करून नवीन आयुष्य सुरू करायचे होते आणि अतुल यांच्या विम्याच्या पैशांवर तिचा डोळा होता, म्हणूनच तिने इंटरनेटवरील जुन्या गुन्ह्यांची पद्धत वापरून हा स्नेक मर्डरचा प्लॅन आखला होता. आरोपींच्या कबुलीनाम्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात सापाची व्यवस्था करणाऱ्या सोनू आणि उदय कुमार या दोन्ही गारुड्यांनाही बहसुमा परिसरातून अटक केली.

Meerut Murder Case : मेरठचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, हा गुन्हा क्रूर स्वरूपाचा आहे, जिथे एका जिवंत प्राण्याला हत्येचे हत्यार म्हणून वापरण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करून चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील चारही मुख्य आरोपी – पत्नी दामिनी, प्रियकर तुषार, सपेरा सोनू आणि दुसरा सपेरा उदय कुमार या सर्वांना मेरठ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावून तुरुंगात पाठवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण मेरठ आणि हस्तिनापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, ज्या पत्नीवर अतुल यांनी जीवापाड प्रेम केले, तिनेच त्यांचा असा भयानक अंत करावा याबद्दल लोक संताप व्यक्त करत आहेत. काही महिन्यांपूर्वी मेरठमध्येच गाजलेल्या मुस्कान रस्तोगी प्रकरणाची आठवण या घटनेने करून दिली, जिथे मुस्कानने प्रियकरासोबत मिळून पतीचे १५ तुकडे केले होते. पण दामिनीने रचलेला हा मण्यार सापाचा कट त्याहूनही अधिक क्रूर होता. आज दामिनी आणि तुषार दोघेही तुरुंगाच्या गजाआड आपल्या पापाची शिक्षा भोगत आहेत, पण विम्याच्या पैशांसाठी आणि अनैतिक संबंधांसाठी एका निष्पाप पतीचा जीव घेणाऱ्या या कृत्याने समाजातल्या नात्यांवरचा विश्वास उडवून लावला आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts