Thyroid and Weight Gain: थायरॉईडचा त्रास आणि वाढतं वजन याबाबत अनेक गैरसमज आहेत. या विषयावर डॉक्टरांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण देत वजन वाढण्यामागचं खरं कारण उलगडलं आहे.
थायरॉईडचा त्रास झाल्यानंतर अनेकजण वाढत्या वजनासाठी केवळ या आजाराला जबाबदार धरतात. मात्र तज्ज्ञांच्या मते हे चित्र इतके सोपे नाही. काही प्रकरणांमध्ये वाढलेले वजन आणि असंतुलित जीवनशैलीही थायरॉईडच्या समस्येला कारणीभूत ठरू शकते.
थायरॉईड आणि लठ्ठपणाचा संबंध काय?
डॉ. आदित्य यादव यांच्या मते, हायपोथायरॉईडीझम असलेल्या अनेक रुग्णांना वजन वाढण्याचे कारण फक्त थायरॉईड आहे. असे वाटते. परंतु लठ्ठपणामुळे शरीरात होणारे काही बदल थायरॉईडच्या कार्यावरही परिणाम करू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी थायरॉईडमुळेच वजन वाढते, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.
हेही वाचा: NEET नंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही चर्चेत; उमेदवारांचे पुराव्यांसह पेपर फुटीचा गंभीर आरोप
शरीरातील चरबी कसा परिणाम करते?
शरीरात अतिरिक्त चरबी साचल्यास दाह निर्माण करणारे काही रसायने आणि हार्मोन्सचे प्रमाण वाढू शकते. यामुळे शरीरात दीर्घकाळ सूज (क्रॉनिक इन्फ्लेमेशन) राहते आणि काही व्यक्तींमध्ये ऑटोइम्यून विकारांचा धोका वाढतो.
या प्रक्रियेचा परिणाम थायरॉईड ग्रंथीवरही होऊ शकतो. तसेच लठ्ठपणामुळे होणारा इन्सुलिन रेसिस्टन्स थायरॉईडच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो.
जीवनशैलीत बदल का आवश्यक?
तज्ज्ञांच्या मते, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबतच जीवनशैली बदल करणे तितके महत्वाचे आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताण- ताणावर नियंत्रण यामुळे वजन तसेच एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
विशेषतः स्नायू बळकट करणारे व्यायाम आणि नियमित शारीरिक हालचाल मेटाबॉलिझम सुधारण्यास उपयुक्त ठरू शकतात.
हायपोथायरॉईडीझममध्ये वजन वाढते का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हायपोथायरॉईडीझममुळे शरीराचा मेटाबॉलिझम काही प्रमाणात मंदावू शकतो, त्यामुळे काही लोकांचे वजन वाढू शकते. मात्र, लक्षणीय लठ्ठपणामागे केवळ थायरॉईडच जबाबदार असतो, असे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.
वजनावर आहार, व्यायाम, हार्मोन्स, झोप, मानसिक आरोग्य आणि इतर अनेक घटकांचा एकत्रित परिणाम होत असतो.
स्वतःहून निष्कर्ष काढू नका
वजन सतत वाढत असेल किंवा थायरॉईडची लक्षणे जाणवत असतील, तर स्वतः निदान करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. योग्य उपचारांसोबत आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यास थायरॉईड आणि वजन या दोन्हींचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते.








