MPSC Drug Inspector Exam: MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावर रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. परीक्षेपूर्वी प्रश्न उपलब्ध झाल्याचा दावा करत त्यांनी पत्रकार परिषदेत काही ठोस पुरावे सादर केले. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घ्या.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणातील कथित गैरप्रकराची माहिती देत काही पुरावेही सादर केले.
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, औषध निरीक्षक भरती परीक्षेचा संपूर्ण पेपर फुटला नसला तरी पेपर तयार करणाऱ्या प्रक्रियेतील एका व्यक्तीकडून माहिती बाहेर गेली असण्याची शक्यता आहे. संबंधित व्यक्तीने आर्थिक व्यवहार करून काही उमेदवारांना परीक्षा होण्यापूर्वी प्रश्न उपलब्ध करून दिल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा: नव्या लिस्टेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; अवघ्या ५ दिवसांत १४० टक्क्यांहून अधिक परतावा
महाराष्ट्रातील पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारवर टीका
रोहित पवार यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात विविध सरकारी भरती परीक्षांमध्ये गैरप्रकारांचे आरोप झाले आहेत. टीईटी, नीट, तलाठी भरती, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या अनेक परीक्षांचा उल्लेख करत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले.
सरकारी नोकरीची मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होता कामा नये, असे सांगत त्यांनी पेपरफुटीच्या घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
औषध निरीक्षक पदाबाबत उपस्थित केले प्रश्न
औषध निरीक्षक हे महत्त्वाचे पद असल्याचे सांगत रोहित पवार यांनी या पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे म्हटले.
त्यांनी आरोप केला की, जर आर्थिक व्यवहार करून एखादी व्यक्ती अशा जबाबदारीच्या पदावर पोहोचली, तर त्याचा परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पेपरफुटी कशी झाली? रोहित पवारांचा दावा
रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक भरतीसाठी २०२५ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेला हजारो उमेदवारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर गुणवत्ता यादी आणि निवड प्रक्रियेदरम्यान काही संशयास्पद बाबी आढळल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमी या खासगी क्लासशी संबंधित व्यक्तीकडून काही विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्न मिळाल्याचा आरोप आहे. संबंधित प्रश्न व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवले जात होते आणि काही वेळाने ते डिलीट केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका विद्यार्थ्याने हे मेसेज सेव्ह करून ठेवले आणि त्यातून पुरावे समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
पत्रकार परिषदेत दाखवले कथित पुरावे
पत्रकार परिषदेदरम्यान रोहित पवार यांनी परीक्षेतील मूळ प्रश्नपत्रिका आणि परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रश्नांमध्ये साम्य असल्याचा दावा केला.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणावर संबंधित यंत्रणांकडून अधिकृत तपास आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








