MPSC Paper Leak : आजपर्यंत ढगफुटी, आमदारफुटी, खासदारफुटी नगरसेवक फुटी…एवढंच काय तर ग्रामपंचायत सदस्यफुटीही ऐकलं होतं, मात्र आजकाल एक वेगळी फुटी या सगळ्यापेक्षा जास्त गाजतेय आणि ती म्हणजे पेपरफुटी…गेल्या 10 वर्षात देशात 152 पेपर फुटले…काल परवाच त्यावरून देशाच्या शिक्षणमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर आता आपल्याच महाराष्ट्रात आणखी एका पेपरफुटीची चर्चा रंगलीय, कारण राष्ट्रवादीचे नेते मेहबुब शेख यांनी थेट राज्यातल्या सर्वोच्च अशा एमपीएससीच्या परीक्षेचाच पेपर फुटल्याचा दावा केल्यानं खळबळ माजलीय, परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका उमेदवारांच्या मोबाईलवर असल्याचं शेख म्हणतायत, पण खरंच असं झालंय का? आणि एमपीएससीनं यात काय भूमिका स्पष्ट केलीय आणि पेपर नेमका कोणत्या परीक्षेचा होता?
MPSC पेपरफुटी? औषध निरीक्षक परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल?
नीटचा पेपर फुटला आणि विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांधही फुटला…कारण गेल्या 10 वर्षात देशात 152 पेपर फुटले तेव्हा हे विद्यार्थी गप्प राहिले, किंवा छोटीमोठी आंदोलनं झाली, मात्र नीटचा पेपर फुटला आणि काही विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली, त्यामुळे संतापलेल्या तरुणाईनं कॉक्रॉच जनता पार्टीच्या नेतृत्वात देशातलं सर्वात ऐतिहासिक आंदोलन केलं आणि थेट देशाच्या शिक्षणंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडला, हा मोर्चा यासाठी ऐतिहासिक होता की मोदी सरकारमधील पहिल्या मंत्र्यांनं राजीनामा दिला, पण हे वादळ शांत झालं नाही तोवर आता मेहबुब शेख यांच्या पोस्टनं खबळ माजलीय, कारण मेहबुब शेख आपल्या पोस्टमध्ये लिहितात…
हेही वाचा : E20 जनता पार्टी काय आहे? इथेनॉल पेट्रोलविरोधात
MPSCचे स्पष्टीकरण; पेपरफुटीचे आरोप फेटाळले, चौकशी सुरू
आज MPSC औषध निरीक्षक परीक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा प्रकार समोर येत आहे. जर हे सत्य असेल, तर हा केवळ पेपरफुटीचा विषय नाही, तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला हादरा देणारा प्रकार आहे. एका प्रश्नपत्रिकेची किंमत काही पानांची नसते. तिच्यामागे हजारो विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत, पालकांचे कष्ट, त्याग आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने असतात. काही मोजक्या लोकांच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. आमचा लढा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि MPSC वरील जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे. आमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणेकडे सादर करण्यास आम्ही तयार आहोत. दोषी कोणताही असो, त्याला कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थी कोणतीही सहानुभूती मागत नाहीत ते फक्त त्यांच्या कष्टाचा न्याय मागत आहेत. MPSC वरील विश्वास टिकवायचा असेल, तर सत्य बाहेर आलेच पाहिजे. सर्व. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे..!
MPSC पेपरफुटीचा दावा; मेहबूब शेख यांच्या आरोपानंतर खळबळ ( MPSC Paper Leak )
आता मेहबुब शेख यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर एमपीएससीचीही झोप उडाली आणि त्यानंतर यावर तात्काळ स्पष्टीकरण दिलंय, त्यांनी औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला नाही, असं म्हणत एमपीएससीकडून पेपरफुटीवर स्पष्ट नकार देण्यात आलाय, 22 मार्च रोजी झालेला औषध निरीक्षक पेपर फुटल्याचे सोशल मीडिया वरून दावा करण्यात येतो आहे, प्रश्नपत्रिका दोन दिवस अगोदर काही विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअपवर गेल्याचा दावा केला गेला, तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे या आरोपात संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एमपीएससीकडून त्याची पडताळणी केली जाणार आहे. असं म्हणत एमपीएससीचे सचिव महिंद्र हरपाळकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून परीक्षा एक महिन्यापूर्वी झाली आणि निकालही लागल्याचेही म्हटलं आहे. तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल मात्र यात जर तथ्य नसेल तर अफवा पसरवण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा एमपीएससीने दिला आहे. त्यामुळे आता शेख यांच्यावरही कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…
MPSC परीक्षा वाद; चौकशीनंतरच सत्य समोर येणार ( MPSC Paper Leak )
पण आता ही अफवा की सत्य हे चौकशीत समोर येईलच, पण आता नुसतं फुटी जरी ऐकलं तर पोरांना धास्ती भरते आणि आता कुठला पेपर फुटला हा प्रश्न पडतो, त्यामुळे एका राजकीय नेत्यानं केलेल्या दाव्यानं एवढा कल्लोळ होणं सहाजिक होतं, देशातल्या पेपरफुटीचा इतिहास हा खूप तगडा राहिलाय, देशातील परीक्षा यंत्रणा आणि शिक्षण व्यवस्थेला लागलेली पेपरफुटीची कीड दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली असून, गेल्या १० वर्षांत देशभरात तब्बल 152 परीक्षांचे पेपर लीक झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका जाहीर पत्रकार परिषदेत ही आकडेवारी मांडत केंद्र सरकारवर आणि देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. या पेपरफुटीच्या सातत्यपूर्ण आणि गंभीर सत्रामुळे देशातील सुमारे साडेसात कोटी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्यावर थेट आणि विपरीत परिणाम झाला आहे. सरासरी काढल्यास गेल्या दशकात दरमहा एक याप्रमाणे पेपरफुटीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे प्रामाणिकपणे दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता, संताप आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम ( MPSC Paper Leak )
यावर विरोधी पक्षाने म्हटले आहे की, देशातील कोट्यवधी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी रक्ताचे पाणी करून पैसे गोळा करतात. उदाहरणार्थ, देशभरातील नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबे दरवर्षी कोचिंग, पुस्तके आणि इतर तयारीवर लाखो रुपये खर्च करतात. ही अवाढव्य रक्कम भारत सरकारच्या एकूण वार्षिक शिक्षण बजेटच्या म्हणजेच १.४ लाख कोटी रुपयांच्या जवळपास बरोबर आहे. इतका प्रचंड खर्च करून आणि वर्षानुवर्षे रोज ८ ते १० तास प्रामाणिकपणे अभ्यास करूनही, परीक्षा देण्याच्या अंतिम क्षणी पेपर लीक झाल्याचे समजल्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर होत आहे. दुसरीकडे, ४० ते ५० लाख रुपये मोजून मागच्या दाराने पेपर खरेदी करणाऱ्या धनदांडग्यांना सहज संधी मिळत असल्याने देशातील परीक्षा पद्धतीमधील विश्वासार्हता पूर्णपणे धोक्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हेही वाचा : परीक्षेच्या दोन दिवस आधी व्हाट्सअँपवर प्रश्न कसे
Drug Inspector Paper Leak
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि खेदजनक बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांत १५२ पेक्षा जास्त पेपरफुटीच्या घटना घडूनही अद्याप एकाही मुख्य दोषीला न्यायालयात कठोर शिक्षा झालेली नाही, अशी टीका केली जात आहे. गुन्हेगारांना होणारी शून्य शिक्षा हेच या गैरप्रकारांचे मनोधैर्य वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. यामुळे परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा, कंत्राटदार कंपन्या आणि सरकारी संस्थांमधील उत्तरदायित्वाचा पूर्णपणे अभाव दिसून येतो. या देशव्यापी समस्येमुळे दिल्लीत आणि इतर राज्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र आंदोलने केली गेली. देशाची शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी परीक्षा पद्धतीत संपूर्ण पारदर्शकता आणणे, तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करणे, पेपरफुटी रोखण्यासाठी अत्यंत कडक देशव्यापी कायदे करणे आणि अशा गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची पाऊलं आता यावर सरकारकडून उचलली जातायत.
एका मराठी पोरानं दिल्ली झुकवली, असं आपण अभिमानानं म्हणतो, पण हेच पेपर फोडणारे देखील महाराष्ट्रातीलच आहेत, यांनाही आपण विसरु नये, त्यांना साथ देणारे अनेक राज्यातील महाभाग आहेत, या सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या, पण आता यांना कठोर शिक्षा होणं गरजेच आहे, कारण या पेपरफुटीतून हे जेवढा पैसा उकळतात, त्यातून जेलमधून सुटून येणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट राहत नाही, त्यामुळे नीटचा पेपर फुटल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच महाराष्ट्रात मास्तरांच्या परीक्षेचा…म्हणजेच टीईटीचाही पेपर फुटल्याचं समोर आलं, त्यानंतर आता भरोसा कोणत्या परीक्षेवर ठेवायचा ? हा प्रश्न पडणं सहाजिक आहे, आता थेट एमपीएससीकडे…म्हणजेच सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परीक्षेच्या पेपरबद्दल अशा बातम्या आल्यावर पोरांच्या पायखालची जमीन सरकणं सहाजिक आहे.
आता या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. तसेच पेपरफुटीतील आरोपींना अटक करावी. हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढावे.









