Ramesh Ghule : बीडनं गुन्हेगारीचे सगळे रेकॉर्ड मोडायचं ठरवलंय, तसेच बीड पोलिसांनीही निष्क्रीयतेचे सगळे रेकॉर्ड मोडायचं ठरवलंय, कारण गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीनं बीड रोज चर्चेत आहेत, याची सुरूवात झाली, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर, त्यानंतर महादेव मुंडे हत्या, त्यानंतर आरोपी अजूनही फरार आहेत, आता अगदी काही दिवस आधी ज्या विलास घुलेची हत्या झाली, त्या विलास घुले प्रकरणात सौरव सोनवणे यांचं नाव आल्यानंतर खळबळ माजली होती, कारण सौरव सोनवणे हे राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र आहेत, त्यानंतर सौरव सोनवणे यांच्या घरी दाखल होत पथकाकडून चौकशीही करण्यात आली होती, मात्र घुले कुटुंबीयांच्या आरोपांच्या पुढं यात दुसरा काही पुरावा आतापर्यंत तरी मिळाला नाही, कारण या प्रकरणात सौरव सोनवणे यांना अटक करावी अशी मागणी घुले कुटुंबीयांकडून होत होती, त्यानंतर बराच राजकीय गदारोळ माजला, घुले कुटुंबीयांनी याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती, पण त्याचं पुढं काही झालं नाही, पण आता या प्रकरणात आणखी एक नवं ट्विस्ट आलंय, कारण रमेश घुले यांना तेट पत्राद्वारे धमकी आल्याचा दावा करण्यात आलाय, तसेत त्यात सौरव सोनवणेंचंही नाव पुढे आलंय, त्यामुळे हे पत्र काय आणि यावरून पुन्हा बीडमध्ये कसे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत?
विलास घुले हत्या प्रकरणाला नवं वळण : ( Vilas Ghule )
Vilas Ghule Murder Case : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य फिर्यादी आणि मयत विलास घुले यांचे सख्खे बंधू रमेश घुले यांना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी जाऊन दोन अज्ञात तरुणांनी जीवे मारण्याची थेट धमकी दिली आहे. “पुरवणी जबाबात घेतलेले बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव तातडीने मागे घे, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिथे दिसाल तिथे संपवून टाकू,” असा इशारा या तरुणांनी दिला आहे. मध्यरात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर रमेश घुले यांनी तातडीने केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात कमालीची खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांची काही दिवसांपूर्वी अत्यंत क्रूरपणे चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून घुले कुटुंबियांनी आणि टाकळी ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, या मागणीसाठी विलास घुले यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर ठेवून तीव्र ठिय्या आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन इतके तीव्र होते की प्रशासनाला त्याची तात्काळ दखल घ्यावी लागली. अखेर राज्य शासनाने या संवेदनशील प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठीत करण्याचा निर्णय घेतला. एसआयटीची स्थापना झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला.
हेही वाचा : फडणवीसच मोदींच्या मनातले शिक्षणमंत्री’ अखेर दिल्लीत जावंच लागणार?
रमेश घुले यांनी नेमका काय दावा केला? ( Ramesh Ghule )
आंदोलक आणि घुले कुटुंबियांच्या मागणीनुसार पोलिसांनी या गुन्ह्यात मुख्य आरोपींव्यतिरिक्त पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्या आणि आरोपींना पाठबळ देणाऱ्या संशयितांचा शोध सुरू केला. याच प्रक्रियेदरम्यान, मयताचे बंधू आणि फिर्यादी रमेश घुले यांनी पोलिसांसमोर आपला पुरवणी जबाब नोंदवला. या पुरवणी जबाबात त्यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. सौरभ सोनवणे यांनीच या प्रकरणातील मुख्य आरोपींना आर्थिक
आणि राजकीय पाठबळ दिले, त्यांना हत्येसाठी चिथावणी दिली आणि गुन्ह्यानंतर आरोपींना पळून जाण्यास मदत केली, असा थेट आरोप घुले कुटुंबियांनी केला. रमेश घुले यांच्या या पुरवणी जबाबानंतर पोलिसांनी सौरभ सोनवणे यांचे नाव या गुन्ह्यात संशयित म्हणून समाविष्ट केले, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला हाय-प्रोफाइल राजकीय वळण मिळाले.
खासदारपुत्राचे नाव या खून प्रकरणात आल्यानंतर बीडमधील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि स्थानिक प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी प्रमुख आयपीएस व्यंकटराम यांच्या पथकाने सौरभ सोनवणे यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. एसआयटीने सौरभ सोनवणे यांची सुमारे चार तास कसून चौकशी केली आणि त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. या चौकशी दरम्यान खासदार बजरंग सोनवणे आणि सौरभ सोनवणे यांनी आपल्यावरील सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीतून आणि जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी करण्यात आल्याचा दावा केला. आपण कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सामील नसून पोलीस प्रशासनाला आणि एसआयटी तपासाला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
सौरव सोनवणे यांचं नाव तक्रारीत का आलं? ( Saurav Sonawane )
सौरभ सोनवणे यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू असतानाच आता मुख्य फिर्यादी रमेश घुले यांना थेट त्यांच्या घरी जाऊन धमकी देण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. रमेश घुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास सर्व कुटुंब झोपलेले असताना त्यांच्या घराचे दार जोरात वाजवण्यात आले. दार उघडले असता समोर उभे असलेल्या दोन अज्ञात तरुणांनी अत्यंत आक्रमक भाषेत रमेश घुले यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी थेट सौरभ सोनवणे यांचे नाव पुरवणी जबाबातूत आणि गुन्ह्यातून काढून घेण्याची मागणी केली. जर नाव काढले नाही, तर त्याचे परिणाम गंभीर होतील आणि संपूर्ण घुले कुटुंबाला संपवून टाकण्यात येईल, अशी उघड धमकी देऊन हे तरुण अंधाराचा फायदा घेत मोटारसायकलवरून पसार झाले.
या मध्यरात्रीच्या धमकी सत्रानंतर रमेश घुले आणि त्यांचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आले आहे. त्यांनी सकाळीच केज पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली आणि अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या घटनेमुळे आता घुले कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. हत्येच्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि फिर्यादीलाच जर अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल, तर बीड जिल्ह्यात कायद्याचे राज्य राहिले आहे का, असा सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. केज पोलीस आता या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्या दोन अज्ञात तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
धमकीनंतर बीडमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापलं
राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला एसआयटी या प्रकरणाचा तांत्रिक आणि कायदेशीर तपास करत असताना, दुसऱ्या बाजूला फिर्यादीवर दबाव आणण्यासाठी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याने तपासाच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यामुळे झोपलेले पोलीस आता तरी जागे होणार का? असा संतप्त सवाल बीडकर विचारतायत, कारण महादेव मुंडे प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे या पोलीस ठाण्याच्या चक्रा मारून कंटाळल्या, मात्र अजूनही त्यांचे गुन्हेगार मोकाटच आहेत, तर दुसरीकडे सर्वात जास्त उद्रेक झालेलं प्रकरण म्हणजे सरपंच सतोष देशमुख हत्याकांड…त्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजून पोलिसांना सापडला नाही, एवढी पोलिसांची नाचक्की कधी झाली नाही, त्यामुळे या प्रकरण तरी पोलीस आपलं अपयश झाकणार का? हे कळेलच..








