Mumbai Watermelon Death Case : मुंबईच्या पायधुनी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. सुरुवातीला, कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं, परंतु अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अहवालानं आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. सध्या, मुंबई पोलीस विषशास्त्र अहवालाची वाट पाहत आहेत, कारण त्यातून मृत्यूचं खरं कारण उघड होईल.
हेही वाचा : 4 मे नंतर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ होणार? केंद्रीय
भेसळीचा पुरावा आढळला नाही :
अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) प्राथमिक तपासात खाद्यपदार्थांमध्ये कोणतेही विषारी किंवा हानिकारक पदार्थ आढळले नाहीत. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून बिर्याणी, कलिंगड, रेफ्रिजरेटरमधील पाणी, कच्चा आणि शिजवलेला भात, चिकन, खजूर आणि मसाले यासह 11 नमुने गोळा केले. मात्र चाचणीत भेसळीचा कोणताही पुरावा न आढळल्यानं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालं आहे.
शवविच्छेदन अहवालातून वेगळंच चित्र :
या चारही व्यक्तींच्या शवविच्छेदन अहवालातून मात्र वेगळेच चित्र समोर आलं आहे. अहवालात मृतांच्या शरीरात मॉर्फिन या वेदनाशामक औषधाची उपस्थिती आढळून आली. याव्यतिरिक्त, शरीराच्या काही उतींमध्ये (टिश्यूज) एक असामान्य हिरवा रंग आढळून आला. असा बदल सामान्यतः विषारी पदार्थामुळं होतो. मात्र, ते विष नेमकं कोणतं होतं आणि ते शरीरात कसे शिरले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काय आहे प्रकरण :
26 एप्रिल रोजी उघडकीस आलं. 40 वर्षीय अब्दुल्ला डोकाडिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी डॉक्टरांना सांगितले की, कलिंगड खाल्ल्यानंतर ते, त्यांची पत्नी नसरीन (35) आणि त्यांच्या दोन मुली, आयेशा (16) आणि झैनब (13), अचानक आजारी पडले. त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावली आणि अखेरीस चौघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला.
विषशास्त्र अहवाल येणे बाकी :
तपास अधिकारी सांगतात की ते या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत, परंतु अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. कलिना फॉरेन्सिक लॅब, एफडीए आणि जेजे हॉस्पिटलकडून सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे विष सेवन केले गेले होते का आणि तसे असल्यास, ते कोणत्या वेळी केले गेले, हे विषशास्त्र अहवालातून स्पष्ट होईल.






