पुणे | सचिन धुमाळ, प्रतिनिधी
MPCB Officers Suspended: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागात ( Pune Latest News ) कथित आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. उद्योगांना परवानगी देण्याच्या प्रक्रियेशी संबंधित कथित आर्थिक देवाणघेवाणीच्या प्रकरणात मंडळाने मोठी कारवाई करत पुण्यातील तब्बल सहा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये एका प्रादेशिक अधिकाऱ्यासह दोन उपप्रादेशिक अधिकारी आणि तीन क्षेत्र अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि स्वतंत्र विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
मंडळाच्या कार्यालयीन आदेशांनुसार पुण्यातील एका प्रादेशिक अधिकाऱ्यासह दोन उपप्रादेशिक अधिकारी आणि तीन क्षेत्र अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उद्योगांना परवानगी देण्याच्या प्रक्रियेशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारींसोबत चित्रफितींचे पुरावे
उद्योग सुरू करण्यासाठी तसेच उद्योग चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या संमती मंजुरी प्रक्रियेशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांबाबत मंडळाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींसोबत अनेक चित्रफितींचे पुरावे जोडण्यात आल्याचे कार्यालयीन आदेशांमध्ये नोंद करण्यात आले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात स्पष्टीकरण मागविण्यात आले होते.
संबंधित अधिकाऱ्यांनी आपापले लेखी खुलासे सादर केले. मात्र, सक्षम प्राधिकाऱ्यांनी हे खुलासे समाधानकारक नसल्याचे नमूद करत अमान्य केले. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले.
विभागीय चौकशीतून सत्य समोर येणार
कथित आर्थिक देवाणघेवाण नेमकी कशा प्रकारे झाली, त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय होती आणि उद्योगांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेशी या प्रकरणाचा काय संबंध आहे, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीच्या अधीन राहून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत निलंबन कायम राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे. तसेच नियंत्रण अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.








