Raut on CM Suvendu Corruption : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला न भूतो न भविष्य असं दणदणीत यश मिळालं. ममता बॅनर्जींसह (Mamata Banerjee) त्यांच्या तृणमूल काँग्रेसचा (Trinamool Congress) दारून पराभव झाला. यामुळे त्यांचा मागील अनेक वर्षांची सत्ता खालसा झाली अन् भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली. आज भाजप सरकारचा शपथविधी सोहळा राजधानी कोलकाता येथे पार पडला. सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ (Chief Minister Oath) घेतली. या समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवारांची शपथविधीला उपस्थिती
तसेच महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांनी देखील शपथविधी सोहळ्यास हजेरी लावली. दरम्यान, याच शपथविधीवरून आणि सत्तास्थापनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा भाजपने कायम राखली आहे, त्याबद्दल, त्या कनिस्ट्न्सीबद्दल त्यांच अभिनंदन केलं पाहिजे, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी लगावला. भारतीय जनता पक्षाने आपली परंपरा कायम राखली आहे. अत्यंत भ्रष्ट अशा व्यक्तीला मंत्रीपदी किंवा मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम ठेवली.
सुवेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी
दरम्यान पुढे बोलताना ते हेही म्हणाले, २०२० साली एक स्टिंग ऑपरेशन झालं आणि तृणमूल काँग्रेसच्या 5 खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आलं. त्यांच्यामध्ये सुवेंदू अधिकारी होते. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकल्या. या धाडी टाकायला सुरूवात झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी हे भाजपात सामील झाले. आणि आज ते मुख्यमंत्री बनत आहेत, अस संजय राऊत यांनी नमूद केलं.
तो डाग अजूनही स्वच्छ झालेला नाही – संजय राऊत
पण आजही आपण पाहिलं तर, थोड्या वेळाने मी तो व्हिडीओ टाकणार आहे. पण भाजपचे नेते असलेले सुवेंदू अधिकारी, बंगालचे मुख्यमंत्री बनणारे सुवेंदू अधिकारी हे आजही, अजूनही त्या वॉशिंग मशीनमध्येच फिरत आहेत. तो डाग अजूनही स्वच्छ झालेला नाही. ते सरळ असे पैसे स्वीकारतात. अशा माणसाला राज्याचं मुख्यमंत्री पद देत आहेत. भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा राखली, त्यांच्या या कन्सिस्टन्सीचं अभिनंदन केलं पाहिजे, असा सणसणीत उपरोधिक टोला संजय राऊत यांनी हाणला.











