Daughter Wedding Father Funeral : घरात आनंदाचं वातावरण होतं कारण लाडक्या मुलीचं उद्या आणि मुलाचं आज लग्न होतं. सगळीकडे आनंदी आनंद. पाहुणे आले, सनई चौघडे वाजू लागले, मात्र तितक्यात एक बातमी कानी आली आणि सगळीकडे सुन्न शांतता पसरली. बातमी होती ज्या घरात लग्न होतं त्या लेकरांच्या बाप आता नाही राहिला. घरातून सकाळी आनंदाने गेला, मात्र परत आलाच नाही. पायी चालत असतांना वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली आणि या अपघातात मृत्यू झाला. आणि होत्याचं नव्हत झालं.
बुलढाण्याच्या खामगाव ते नांदुरा दरम्यान असलेल्या कोलासर फाट्याजवळ दुचाकीचा धडकेत आज सकाळी साडे सहा वाजल्याच्या सुमारास एक अपघात झाला आणि या अपघातात, पंढरी त्र्यंबक बगाडे यांचा जागीच मृत्यू झाला. पंढरी बगाडे यांच्या मुलाचं आज लग्न होतं तर उद्या मुलीचं लग्न होणार होतं. मात्र लग्नाच्या दिवशीच पंढरी बगाडे यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला आणि ज्या घरात आनंदाचे वातावरण होते तेथे शुकशुकाट झाला. हा फक्त अपघात नाही तर एका कुटुंबावर आणि त्या लेकरांच्या मनावर पडलेला मोठा आघात आहे.
आनंदाची हळद आता अश्रूंमध्ये मिसळली
त्या बापाच्या मनात किती हौस असेल ना? मुलाच्या वरातीची आणि लेकीच्या पाठवणीची. पण नियतीने असा खेळ मांडला की आनंदाची हळद आता अश्रूंमध्ये मिसळली आहे. एका बाजूला लग्नाचा मांडव उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच वडिलांचा अंत्यविधी. अपघात फक्त एका माणसाचा जीव घेत नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आधार हिरावून नेतो. आज अख्खं गाव हळहळतंय. कारण नियतीने एका बापाची लेकरांच लग्न पहायची संधीही हिरावून घेतली.
अपघाताने फक्त जीव नाही, संपूर्ण कुटुंब उद्धस्त झालं
अपघात फक्त एका माणसाचा जीव घेत नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आधार हिरावून नेतो. आज अख्खं गाव हळहळतंय. गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारच्या काही इतर घटनाही समोर आल्या आहेत, नांदेड २६ एप्रिल २०२६ ला किनवट तालुक्यातील कोठारी येथील सदाशिव गोविंदा घमेवाड यांचाही मुलांच्या लग्नाच्या दोन दिवस आधी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न २८ एप्रिल रोजी एकाच दिवशी होणार होते. नगर जामखेड मध्ये मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधून परतत असताना महादेव लक्ष्मण फरताडे यांचा अपघातात मृत्यू झाला होता. पण नियतीच्या पुढे कोणाला जाता येत नाही.
लग्नाची मुंडावळी बांधायच्या वेळी, कपाळावर दुःखाचा टिळा
ज्या बापाच्या खांद्यावर बसून जग पाहिलं, आज त्याच बापाला खांदा द्यावा लागणार आहे. मुलाच्या डोक्यावर लग्नाची मुंडावळी बांधायच्या वेळी, कपाळावर दुःखाचा टिळा लागलाय. दारात सजलेली ती नवरीची गाडी आणि शेजारीच उभी असलेली ही वडिलांची तिरडी. हे दृश्य काळजाचे पाणी करणारं आहे. मांडवातून सनईचे सूर नाही, तर आता हुंदके ऐकू येत आहेत. कालपर्यंत जे ‘वऱ्हाडी’ म्हणून आले होते, आज तेच अंत्ययात्रेचे साक्षीदार झाले आहेत. बाप असतो घराचा आधार असतो पण आज तोच आधार सोडून गेल्यावर या मांडवाखालची सावलीही परकी झालीये. एका बाजूला लग्नाची तयारी आणि दुसऱ्या बाजूला आयुष्याची अखेरची वारी. यालाच म्हणतात नियतीचा अजब खेळ.











